पातोंड्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा आठ जणांना चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 10:29 PM2018-10-22T22:29:33+5:302018-10-22T22:32:29+5:30
सोमवारी सकाळ पासून पिसाळलेल्या कुत्र्याने आठ जणांना चावा घेऊन जखमी केले. यात सहा बालकांसह दोन वृद्ध महिलांचा समावेश आहे.
पातोंडा, ता. अमळनेर : येथे सोमवारी सकाळ पासून पिसाळलेल्या कुत्र्याने आठ जणांना चावा घेऊन जखमी केले. यात सहा बालकांसह दोन वृद्ध महिलांचा समावेश आहे. पिसाळलेल्या कुत्र्याला दक्षिणीमुखी हनुमान मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मारून विल्हेवाट लावली.
पातोंडा येथील ओम संतोष पवार (वय ६) हा विद्यार्थी शाळेतून घरी येत असतांना कुत्र्याने त्याच्या पाय व मांडीला चावा घेतला. कैलास रामलाल पावरा (वय ४) याच्या उजव्या हाताला व रईलास रामलाल पावरा (वय ५) या दोन्ही भावंडांना ते खेळत असतांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. अभय बापू कोळी (वय १३) व भावेश पुरुषोत्तम पाटील (वय ३) हे दोन्ही मुल अंगणात खेळत असतांना त्यांनाही चावा घेतला. प्रज्ञा कचरू संदानशिव (वय १७) या मुलीला चावा घेतला. त्याच बरोबर दत्त मंदिर चौकातील रमाबाई भिकन सुतार (वय ५८) ही महिला दुपारी घरात असतांना अचानक पिसाळलेला कुत्रा घरात घुसून या महिलेला चावा घेतला.
इंदूबाई वसंत लोहार (वय ६५) ही वृद्ध महिला घराच्या व्हरांड्यात बसली होती. त्यावेळी पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्या डावा पायाला चावा घेऊन गंभीर जखमी केले. त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी धुळे येथे पुढील उपचारासाठी पाठवले.