पुन्हा तिघांना चावा, पांढऱ्या कुत्र्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:12 AM2021-07-10T04:12:30+5:302021-07-10T04:12:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जुन्या जळगावात दहशत माजवणाऱ्या पांढऱ्या कुत्र्याने याच भागात गुरुवारी रात्री आणखी दोघांना शिवाय गणेश ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जुन्या जळगावात दहशत माजवणाऱ्या पांढऱ्या कुत्र्याने याच भागात गुरुवारी रात्री आणखी दोघांना शिवाय गणेश कॉलनीतील एकाला चावा घेतल्याची घटना रात्री घडली होती. या तिघांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हे एकच कुत्रे असल्याची माहिती संबंधितांनी दिल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
यातील एका तरुणाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, चेहऱ्याला गंभीर इजा झालेल्या सोनी पाटील या महिलेवर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या महिलेच्या चेहऱ्याला याच कुत्र्याने गंभीररित्या चावा घेतला होता. यासह तीन महिलांनाही कमी-अधिक प्रमाणात जखमी केले होते.
दिलीप चौबे यांना वाईट अनुभव
व्यावसायिक दिलीप चौबे हे पहाटे फिरायला गेलेले असताना त्यांच्याही मागे चार ते पाच कुत्र्यांनी धाव घेतली होती. मात्र, आपण जोरात पळून कसे तरी घरी पोहोचलो व बचावलो, असा अनुभव त्यांनी सोशल मीडियावर ‘लोकमत’च्या वृत्तासह शेअर केला आहे.
मोकाट कुत्र्यांमुळे परिस्थिती गंभीर असून महापालिकेने याबाबत कठोर पावले उचलावीत, कोणाचा जीव गेल्यास याला महापालिका जबाबदार राहील, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.