भाजपा व वंचित आघाडीतच खरी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 11:12 AM2019-03-23T11:12:12+5:302019-03-23T11:12:17+5:30
अॅड.प्रकाश आंबेडकर : सामाजिकरण होण्यासाठी वंचितांना उमेदवारी
जळगाव : लोकसभा निवडणुकीत खरी लढत भाजपा व वंचित बहुजन आघाडीतच होईल, असा दावा वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. शरद पवार यांच्यासारख्या नेत्याने माढामधून माघर घेणे हे धक्कादायक असल्याचे ते म्हणाले.
जळगावात आयोजित सभेसाठी ते शुक्रवार, २२ मार्च रोजी सकाळी पोहोचल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, निवडणुकीचे सामाजिकरण व्हावे. आज लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीप्रमाणे नात्या- गोत्यातील लोकांना उमेदवारी देऊन लढविल्या जातात. बहुजनांना संधी देणार कोण? म्हणून आम्ही सर्व समाजांना एकत्र घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहोेत. या ही पुढे जाऊन ज्या जातीच्या उमेदवाराला संधी दिली. त्याची जातही देत आहोत.
चार जागांचा निर्णय बाकी
एमआयएमचा औरंगाबाद व उत्तरमध्य मुंबईतून उमेदवार असेल. याशिवाय सोलापूर, नागपूर, अकोला व उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवार जाहीर करणे बाकी असल्याचे ते म्हणाले.
सर्वांना शिक्षण
अजेंड्यामध्ये सर्वांना शासनामार्फत शिक्षण मिळावे, केजी टू पीजी सर्व शिक्षण स्पर्धामुक्त व्हावे अशी जबाबदारी सरकारची असावी, यामुळे संस्थांकडून होणारे बाजारीकरण थांबेल. तसेच बॅँकींग पद्धतीत तारणाशिवाय कर्जच मिळत नाही, यासाठी समांतर बॅकिंग व्यवस्था निर्माण करून वंचितांना विनातारण कर्ज कसे मिळू शकेल, असे आपले प्रयत्न असतील. यासाठी रोजगार निर्मितीवरही आपला भर असेल, असे सांगितले.
यावेळी माजी मंत्री दशरथ भांडे, उमेदवार अंजली बाविस्कर, मुकुंद सपकाळे यांच्यासह जळगाव, धुळे, नंदुबार जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
कुणाचीही लाट नाही
शरद पवार यांनी माढामधून उमेदवारी मागे घेणे हे धक्कादायक होते, असे सांगत यावेळी लाट हा प्रकार नसेल असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, व्यापारी वर्गात सत्ताधाऱ्यांबद्दल नाराजी आहे. त्यामुळे लाट ही कुणाचीही दिसत नाही. मात्र लढतच विचारात घेतली तर ती कॉँग्रेस विरूद्ध भाजपा अशी नाहीच. भाजपा विरूद्ध वंचित बहुजन आघाडीतच असल्याचे त्यांनी सांगितले.