भाजपा व मनपा प्रशासनात मिलिभगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:10 AM2020-12-07T04:10:45+5:302020-12-07T04:10:45+5:30
बीएचआर प्रकरणात दाखल गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुनील झंवर यांच्या रमेश मोटार ड्रायव्हींग स्कूल येथील कार्यालयावर टाकलेल्या छाप्यात ...
बीएचआर प्रकरणात दाखल गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुनील झंवर यांच्या रमेश मोटार ड्रायव्हींग स्कूल येथील कार्यालयावर टाकलेल्या छाप्यात शहरातील सफाईचा ठेका दिलेल्या वॉटरग्रेसशी संबंधीत महत्वाचे दस्तावेजही पथकाच्या हाती लागल्याने सत्ताधारी व विरोधकांचे धाबे दणाणले आहे. याप्रकरणी सत्ताधाऱ्यांसोबतच ८ महिन्यांपूर्वी विरोध करणारे विरोधक आता गप्प का? असा सवाल करणारे ‘लोकमत’ने वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्यावर मनपातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे भूमिका स्पष्ट केली आहे.
भाजपाचे आमदार व पदाधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद
वॉटरग्रेसला ठेका देण्यासंदर्भात भाजपाचे आमदार व पदाधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद आहे. तसेच या ठेक्याला विरोध केला असता प्रशासनाने हा ठेका वॉटरग्रेसला देणे कायदेशिररित्या का बंधनकारक आहे? हे वॉटरग्रेसची बाजू घेत अनेक वेळेला सभेमध्ये स्पष्ट केले. सफाईचे काम ठेकेदाराकडून करून घेण्याची जबाबदारी प्रशासनाचीच आहे. शिवसेनेचे कोणतेही नगरसेवक पाकीट स्विकारत नाहीत. या उलट राष्ट्रवादीचे महानगराध्यक्षांनी नगरसेवकांना पाकीटे दिली जात असल्याचा जाहीर आरोप केला होता. यावरून भाजप व मनपा प्रशासन यांची मिलिभगत आहे? हे स्पष्ट होते, असा आरोपही महाजन यांनी केला आहे.
भाजपात ५ गट, नेतृत्वाचा अभाव
शिवसेनेची भूमिका हे कायम शहराच्या सर्वांगिण विकासाची आहे. याउलट संपूर्ण बहुमत मिळूनही भाजप नगरसेवकांचे ५ गट व नेतृत्वशून्य असल्यामुळे, कोणालाही कोणाबद्दल विश्वास नसल्यामुळे जळगावकर वेठीस धरले जात असल्याचा आरोपही महाजन यांनी केला आहे. आम्ही सत्तेत असताना असे कधी महापालिकेत होत नव्हते. सेना विरोधक म्हणूनही यापुढील काळात शहर विकासासाठी सक्षम भूमिका बजावेल असा दावा त्यांनी केला आहे. भाजपा नेतृत्वहीनतेमुळे अडचणीत आला असून लोकांना सोयीसुविधा देण्यात असमर्थ ठरल्यानेच विरोधकांविषयी गैरसमज पसरवित असल्याचा आरोपही महाजन यांनी केला आहे.
चाैकट
सेनेने पत्रकार परिषद मात्र टाळली
माजी मंत्री गिरीश महाजन यांचे नाव वॉटरग्रेसशी जोडले जात असल्याने सत्ताधारी भाजपासोबतच महाजन यांच्याशी वैयक्तिक घनिष्ठ संबंध असलेल्या मनपातील सेनेचे नेतृत्व करणाऱ्या नगरसेवकांची चांगलीच पंचाईत झाली आहे. त्यामुळेच महाजनांसंबंधीच्या मुद्यावर बोलणे टाळले जात आहे. त्यामुळेच पत्रकार परिषद घेणे टाळल्याची चर्चा सुरू झाली आहे.