शेंदुर्णी न.प.निवडणूक : भाजप विरोधकांना चपराक, मतदारांची विकासाला साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 04:58 PM2018-12-10T16:58:39+5:302018-12-10T17:01:06+5:30
शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीचा निकाल भाजप विरोधात सर्व शक्तिनीशी एकत्र आलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सह शिवसेना व मनसेसाठी अतिशय धक्कादायक आहे. मतदारांनी भरघोस मतदान करुन जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांचेवर विश्वास व्यक्त केला आहे.
मोहन सारस्वत
जामनेर : शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीचा निकाल भाजप विरोधात सर्व शक्तिनीशी एकत्र आलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सह शिवसेना व मनसेसाठी अतिशय धक्कादायक आहे. मतदारांनी भरघोस मतदान करुन जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांचेवर विश्वास व्यक्त केला आहे.
शेंदुर्णीच्या लढतीकडे विधानसभेची ट्रेलर म्हणुन पाहिले गेले. पाच वर्षापूर्वी ग्रामपंचायतीत भाजप बहुमतात आल्यानंतर झालेल्या निवडणुकीत शेंदुर्णीतील मतदारांनी पंचायत समितीसाठी व जिल्हापरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडुन दिले होते. याची आठवण काही कार्यकर्ते यावेळी करुन देतात. यानंतर अवघ्या दोन वर्षानंतर शहरातील मतदारांचा बदललेला कौल निर्णायक मानावा लागेल.
भाजपच्या नेतृत्वाखालील ग्रा.पं.च्या कारभारातील उणे दुणे विरोधकांनी प्रचाराच्या माध्यमातून मतदारांसमोर ठेवली. झालेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप केला. भाजपने देखील त्याला जशास तसे उत्तर देऊन आपली बाजू मांडली. या आरोप प्रत्यारोपात मतदारांनी मात्र आपला कौल भाजपला दिल्याने त्यांचा विकासावर व जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी दिलेल्या शब्दावर विश्वास असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
भाजपकडुन पैशांचा मोठा वापर झाला व पराभवास ईव्हीएम जबाबदार असल्याचे विरोधक म्हणतात, यात सत्य किती व असत्य किती हा वादाचा व संशोधनाचा विषय आहे. लोकशाही मार्गाने मतदारांनी दिलेला कौल सर्वांनीच मान्य केला पाहिजे.
या निवडणुकीत प्रथमच शिवसेना व मनसे स्वबळावर लढल्याने त्यांचे पक्षचिन्ह मतदारांपर्यंत पोहचले. निवडणुकीतील जय, पराजय हे पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरत असल्याने पराभवाची चिंता न करता नव्या उमेदीने वाटचाल करण्याचा संदेश मतदारांनी त्यांना दिला आहे. शिवसेनेची आक्रमकता व आमदार किशोर पाटील यांची मंत्री महाजन विरोधी भूमिका शेंदुर्णीच्या माध्यमातुन समोर आली.
भाजपने शेंदुर्णीकरांना दिलेली आश्वासने पुर्ण करण्याची जबाबदारी पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा विजया खलसे व त्यांच्या सहकारी नगरसेवकांची आहे. पाणी, आरोग्य या मुलभुत सुविधा मतदारांना पाहिजे, त्या पुरविण्याची हमी भाजपने घ्यावी.
नगरपंचायतीत राष्ट्रवादी, कॉंग्रेस आघाडीच्या चार नगरसेवकांना जागल्याची भुमीका घ्यावी लागेल. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवुन विकास कामे करवून घेण्याची जबाबदारी त्यांची आहे. निवडणुक प्रचारातील कटुता विसरुन शहरासाठी एकत्रित काम करण्याची संधी मिळाली असल्याने त्याचे सोने करावे अशी नागरीकांची अपेक्षा आहे.