ज्येष्ठ नेत्यांचा फोन आल्यानंतर भाजपने बदलली भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:16 AM2021-05-13T04:16:46+5:302021-05-13T04:16:46+5:30
वॉटर ग्रेसच्या लवादप्रकरणी विरोधानंतर भाजपची तटस्थ भूमिका : दोन जेष्ठ नगरसेवकांची महाजनांनी केली झपाई लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव ...
वॉटर ग्रेसच्या लवादप्रकरणी विरोधानंतर भाजपची तटस्थ भूमिका : दोन जेष्ठ नगरसेवकांची महाजनांनी केली झपाई
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहराच्या दैनंदिन साफसफाई करण्यासाठी नेमलेल्या वॉटरग्रेस कंपनी व मनपा दरम्यान लवाद नेमण्याचा प्रस्ताव महासभेत शिवसेनेने बहुमताने मंजूर केला असला, तरी या प्रस्तावाला विरोध करणे भाजपच्या काही नगरसेवकांना जड पडले आहे. याप्रकरणी भाजपच्या नगरसेवकांना तटस्थ राहण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या होत्या. मात्र, महासभेत काही नगरसेवकांनी तटस्थतेची भूमिका न घेता विरोध दर्शवल्याने माजी मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपच्या दोन ज्येष्ठ नगरसेवकांची तीव्र शब्दात झपाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वॉटरग्रेस प्रकरणी लवाद नियुक्त करण्यात आला तर पाठिंबा देणारे नगरसेवक अडचणीत येतील, असा दावा ॲड.विजय पाटील यांनी केला होता. त्यानंतर अनेक नगरसेवकांमध्ये चलबिचल पहावयास मिळाली होती. तसेच या प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी देखील पाठिंबा देणाऱ्या नगरसेवक येथील असा दावा केल्याने राजकारण चांगलेच पेटले होते. या प्रकरणी भाजपच्या पार्टी मीटिंगमध्ये माजी मंत्री गिरीश महाजन यांनी तटस्थ राहण्याचा सूचना भाजप नगरसेवकांना दिल्या होत्या. मात्र बुधवारी झालेल्या महासभेत भाजपच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी संतापाच्या भरात या प्रस्तावाला विरोध असल्याचे सांगितले. याबाबत गिरीश महाजन यांना माहिती दिल्यानंतर महाजन यांनी संबंधित दोन्ही नगरसेवकांना फोन करून या प्रकरणी तटस्थ राहण्याचा सूचना दिल्या. तसेच दोन्ही नगरसेवकांचा चांगल्याच शब्दात समाचार घेतला असल्याची ही माहिती भाजपच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.