भाजपच्या फलकावरून मुख्यमंत्री गायब; ट्रोल झाल्यावर केली दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 01:01 PM2019-08-08T13:01:54+5:302019-08-08T13:02:36+5:30
जिल्हा बॅँकेच्या कर्जमुक्तीचे फलक सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तर्कवितर्कांना आले उधाण
जळगाव : जिल्हा बँकेची कर्जफेड मनपाने बुधवारी केली. बऱ्याच वषार्नंतर मनपा कर्जमुक्त झाल्याने त्या विषयीचे ‘आश्वासन पूर्तीकडे’... या विषयी तयार करण्यात आलेल्या फलकावर भाजपाच्या सर्व नेत्यांचे छायाचित्र असताना केवळ मुख्यमंत्र्यांचेच छायाचित्र नसल्याने त्या विषयी तर्कवितर्क लावून ते सोशल मीडियावर व्हायरल झाले. दरम्यान, हा फलक तयार करणाºयाकडून ते नजरचुकीने झाले असून त्यात दुरुस्ती करण्यात आल्याचे आमदार सुरेश भोळे यांनी म्हटले आहे.
जिल्हा बँकेचे कर्जफेडी चे श्रेय घेण्याच्या घाईत मनपा भाजप गटाने फलक तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यात निवडणुकीत कर्जमुक्त मनपाचे आम्ही आश्वासन दिले होते, त्या आश्वासनपूर्तीकडे पहिले पाऊल व हुडकोच्या कजार्तूनही लवकरच कर्जमुक्त होऊ असा आशय आहे. या फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे यांच्यासह विविध नेते, पदाधिकाऱ्यांचे छायाचित्र आहेत. त्यानंतर खाली आभार म्हणून महापौरांसह मनपाच्या पदाधिकाºयांचे फोटो आहेत.
सर्व नेत्यांचे छायाचित्र असताना व हुडकोचेही कर्ज लवकरच फेडू, असा विश्वास व्यक्त होत असताना तेथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच छायाचित्र नसल्याचे हा फलक दुपारपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला. मुख्यमंत्र्यांची रद्द झालेली महाजनादेश यात्रा, माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलेली मुख्यमंत्रीपदाची इच्छा, एकनाथराव खडसे यांनी या इच्छेवरून स्वत: चा दिलेला दाखला या पार्श्वभूमीवर हे फलक चर्चेत आले. भाजपचा मनपा गट ट्रोल झाल्याने संध्याकाळी मुख्यमंत्र्यांचे छायाचित्र असल्याचे याच आशयाचे फलक सोशल मीडियावर फिरु लागले.
फलक तयार करणाºयाकडून ही चूक झाली आहे. कोणत्या फलकावर मुख्यमंत्र्यांचा फोटो घ्यायचा हे त्याच्या लक्षात न आल्याने त्याच्याकडून ही चूक झाली. मात्र नंतर लक्षात येताच त्यात सुधारणा करण्यात आली.
-सुरेश भोळ, आमदार