भाजपाचा ५० वर तर माझा ७५ जागांवर दावा : माजी मंत्री सुरेशदादा जैन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 07:02 PM2018-07-11T19:02:09+5:302018-07-11T19:17:17+5:30
जळगाव महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपातर्फे स्वतंत्रपणे ७५ उमेदवार देण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत युती झालेली नाही. भाजपा ५० जागांवर दावा सांगत असेल तर आमचे ७५ उमेदवार विजयी होतील असा विश्वास माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी बुधवारी संध्याकाळी शिवाजी नगरातील त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांसोबत वार्तालाप करताना व्यक्त केला.
जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपातर्फे स्वतंत्रपणे ७५ उमेदवार देण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत युती झालेली नाही. भाजपा ५० जागांवर दावा सांगत असेल तर आमचे ७५ उमेदवार विजयी होतील असा विश्वास माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी बुधवारी संध्याकाळी शिवाजी नगरातील त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांसोबत वार्तालाप करताना व्यक्त केला.
महापालिकेत सद्यस्थितीत युती नाही
जळगावच्या विकासासाठी भाजपा व शिवसेना यांची युती व्हावी यासाठी मी आग्रही होतो. त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानंतर प्राथमिक स्वरूपात काही चर्चा देखील झाली. मात्र आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपा व शिवसेना दोघांनी ७५ अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे आतापर्यंत तरी युती झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आता युती होईल असे वाटत नाही
दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार दिले आहेत. त्यामुळे आता युती होईल असे वाटत नाही. युती करण्याबाबत आपल्याकडे नव्याने कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ललित कोल्हे यांच्या जाण्याचा धक्का नाही
महापौर ललित कोल्हे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत विचारल्यानंतर ललित कोल्हे यांना तरूण व होतकरू म्हणून प्रमोट केले होते. मात्र त्यांना भाजपामध्ये त्यांचे चांगले भविष्य दिसले असेल तर त्यात काही नवीन नाही. राजकारणात अनेक गोष्टी अनुभवल्या आहे. त्यामुळे ललित कोल्हे यांच्या जाण्यामुळे मला काही धक्का वैगरे बसला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
...तर माझा ७५ जागांवर दावा
महापालिका निवडणुकीत भाजपाने ५० जागांवर दावा केला आहे. याबाबत विचारल्यानंतर भाजपा ५० जागांवर दावा करीत असेल तर मी ७५ जागांवर दावा करीत असल्याचे सुरेशदादा यांनी स्पष्ट केले.