भाजपचे नगरसेवक कोलते यांना लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 09:53 PM2020-01-23T21:53:20+5:302020-01-23T21:53:26+5:30
दोघांविरुद्ध गुन्हा : कोलतेंविरुद्धही मारहाणीची तक्रार
भुसावळ : शहरातील भाजप नगरसेवकास लुटल्या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या फिर्यादीत दोघा आरोपींपैकी एकाच्या फिर्यादीवरुन या नगरसेवकासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दिलेल्या फिर्यादी नुसार वृ्र असे की, नगरसेवक किरण कोलते हे हॉटेल बंद करून घराकडे निघाले असताना जामनेर रोडवरील दिनदयाल नगर जवळील नामांकित हॉटेल समोर संशयीत आरोपी संजय लोटन चौधरी व प्रशांत उर्फ मुन्ना संजय चौधरी (रा.भुसावळ) यांनी कोलते यांना शिवीगाळ करीत खिशातील पाच हजार ७०० रुपयांची रोकड हिसकावून पोबारा केला.
याप्रकरणी दोघांविरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर २६ / २९ भादवि कलम ३९२ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना २३ रोजी रात्री पावणे बारा वाजता घडली. या प्रकरणी गुरुवारी पहाटे ५.५० वाजता बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील जोशी करीत आहेत.
दरम्यान मारहाण प्रकरणात बांधकाम ठेकेदार संजय लोटन चौधरी (पंढरीनाथ नगर, जामनेर रोड, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार किरण कोलते, किशोर पाटील, मयूर कोलते, कल्पेश ढाके, दीपा पैलवान (सर्व रा.भुसावळ) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून या सहा जणांनी हॉटेल समोर २३ रोजी रात्री दोन दुचाकींवर काही एक कारण नसताना दगडफेक करीत शिवीगाळ केली, असा आरोप आहे. तपास नाईक रमण सुरळकर करीत आहे.
कोलतेंसह सहा जणांविरुद्धही गुन्हा
कोलते यांच्याविरुद्ध दिलेल्या फिर्यादीनुसार शहरातील दीनदयाल नगर जवळील नामांकित हॉटेल समोर गाळ्याचे बांधकाम सुरू असताना तक्रारदार संजय लोटन चौधरी यांनना शिवीगाळ करीत त्यांच्या मुलासह त्यांच्या भाच्याच्या दुचाकीवर दगडफेक करून वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी भाजपा नगरसेवक किरण कोलते यांच्यासह सहा जणांविरुद्ध बाजारपेठ पोलिस स्टेशनला गु. र. नं. २७ /२० भादवि कलम ४५२ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. २३ रोजी रात्री १२.४५ वाजता ही घटना घडली.