भाजपा नगरसेवक पुत्राचा लोकमत वार्ताहरावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 10:55 PM2018-10-21T22:55:04+5:302018-10-21T22:58:58+5:30
चुकीची बातमी छापल्याचा आरोप करीत भाजपा नगरसेवकाच्या पुत्रासह सहा जणांनी येथील ‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी लियाकत सैयद यांना गांधी चौकात रविवारी सकाळी अकराचे सुमारास मारहाण केल्याची घटना घडली.
जामनेर : चुकीची बातमी छापल्याचा आरोप करीत भाजपा नगरसेवकाच्या पुत्रासह सहा जणांनी येथील ‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी लियाकत सैयद यांना गांधी चौकात रविवारी सकाळी अकराचे सुमारास मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी जामनेर पोलिसात सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकशाहीचा चवथा खांब असलेल्या पत्रकारावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तालुक्यातील पत्रकारांनी निषेध केला असून संशयीतांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दुर्गादेवी विसर्जन मिरवणुक प्रसंगी नगारखान्यात झालेल्या मारहाण प्रकरणाचे वृत्त रविवारी ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध झाले आहे.
रविवारी सकाळी गांधी चौकातील वर्धमान आईस्क्रीम सेंटर जवळ थांबलेल्या लियाकत याच्याजवळ विलास हिवराळे, मोनु जाधव, युवराज खाटीक, युवराजचा भाऊ, छोटू धनगर व कचरे हे हातात काठी, रॉड घेवून आले व पायावर मारहाण सुरु केली. लियाकत यांच्या फियार्दीवरुन सहा जणांविरुध्द कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०७ व १३५ प्रमाणे गुन्हा केला आहे. पोलीस उपअधीक्षक केशव पातोंड यांनी घटनेची माहिती घेतली.तपास सहाय्यक निरीक्षक राजेश काळे करीत आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र प्रसारमाध्यमांतील व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध) अधिनियम, २०१७ नुसार कार्यवाही करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.