भाजपा नगरसेवक पुत्राने शिवसेनेच्या माजी नगरसेवक पुत्राची दुचाकी जाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:23 PM2019-03-04T12:23:28+5:302019-03-04T12:23:51+5:30
दोन गटातील वाद पुन्हा उफाळला
जळगाव : पिंप्राळा हुडकोमध्ये आजी-माजी नगरसेवकातील जुना वाद शनिवारी रात्री पुन्हा उफाळून आला. त्यात माजी नगरसेवक पूत्र जाकीर खान रसूल खान यांची बुलेट पेट्रोल टाकून जाळून टाकल्याची घटना घडली. याप्रकरणी भाजपा नगरसेवक पूत्र शेख शफी शेख शरीफ (रा.हुडको),मोसीन उर्फ विंचू अय्युब खान व अफसर शेख अनवर भिस्ती (दोघे रा.शाहूनगर) या तिघांविरोधात रामानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंप्राळा हुडको भागात भाजपा व शिवसेनेच्या माजी नगरसेवकांमध्ये जुना वाद आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक पूत्र जाकीर खान रसूल खान यांनी शनिवारी रात्री साडे नऊ वाजता त्यांनी बुलेट (क्र.एम.एच १९ सी.क्यू ००२४) ही घराजवळ लावलेली होती. सैय्यद शोहेब सैय्यद अमिन व सैय्यद ईस्माईल लियाकत अली यांच्या लक्षात ही घटना आली.
शस्त्र, पेट्रोलची बाटली होती सोबत
फिर्यादीनुसार, मोसीन उर्फ विंचू व त्याच्यासोबत दोन जणांनी जाकीर खान रसृूल खान यांच्या दरवाजाला लाथा मारल्या. कंपाऊडमधील माठ फोडून, सामानाची फेकाफेक केली व यानंतर बुलेटवर पेट्रोल टाकून पेटूवन दिले, असे शेजारी रहिवासी सैय्यद शाहेब सैय्यद अमिन व सैय्यद ईस्माईल लियाकत अली यांनी जाकीर खान यांनी सांगितले. दुचाकी जाळल्यावर तिघं जण दुचाकीवरुन पळून गेले. यावेळी संशयितांच्या हातात धारदार शस्त्र व पेट्रोलची बाटली होती असेही फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी जावेद रसूल खान यांच्या फिर्यादीवरुन मोसीन उर्फ विंचू अय्युब खान, अफसर शेख अनवर भिस्ती व शेख शफी शेख शरीफ रा.पिंप्राळा हुडको या तिघांविरोधात रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत ७० ते ८० हजाराच्या दुचाकीचे नुकसान झाल्याचे त्यात नमूद आहे.
शफीचा भाऊ तडीपार
नगरसेवक पूत्र शफीचा भाऊ आसिफ याला पोलिसांनी यापूर्वीच तडीपार केले आहे. या दोन्ही गटात यापूर्वी देखील मोठा वाद झाला होता. आता पुन्हा हा वाद उफाळून आला. दरम्यान, पोलिसांनी बुलेट जाळणाऱ्यांना आणले होते, मात्र राजकीय दबावामुळे त्यांना सोडून दिल्याचा आरोप झाला. सहायक निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी चौकशी सुरु असल्याचे सांगितले.