ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने भाजपची राज्यसरकारवर आगपाखड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:12 AM2021-06-27T04:12:15+5:302021-06-27T04:12:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मराठा समाजापाठोपाठ आता ओबीसी आरक्षणदेखील राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झाल्याचा आरोप करीत जळगावात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मराठा समाजापाठोपाठ आता ओबीसी आरक्षणदेखील राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झाल्याचा आरोप करीत जळगावात भाजपच्यावतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आरक्षणासाठी भाजप मराठा व ओबीसी समाजासोबत असल्याचे सांगत भाजपने राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली.
ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने राज्य सरकारच्या विरोधात भाजपच्यावतीने शनिवारी जळगावात भाजप खासदार रक्षा खडसे यांच्या नेतृत्त्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खासदार रक्षा खडसे यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
गिरीश महाजनांची गैरहजेरी असलेल्या या आंदोलनात कार्यकर्तेदेखील कमीच होते. त्यातही आंदोलन करीत असताना चौकातून कार्यकर्त्यांची इकडून तिकडे पळापळ सुरू होती. आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संतप्त भावना व्यक्त केल्या. या आंदोलनामुळे तासभर वाहतूक विस्कळीत झाली होती.