सट्टा बाजाराचा कौल भाजपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:07 PM2019-05-22T12:07:09+5:302019-05-22T12:07:38+5:30
जळगाव लोकसभेसाठी बुकी देखील संभ्रमात
जळगाव/धुळे/नंदुरबार: लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाचा निकाल २३ रोजी जाहीर होणार असून, त्याआधीच या निकालावर कोट्यवधींचा सट्टा लागला आहे. तर काही ठिकाणी पैजा लागल्या आहेत. सट्टाबाजाराचा कौलही भाजपालाच असल्याचे दिसून येत आहे.
रावेरची जागा भाजपाकडेच राहणार
जळगावमध्ये अटी-तटीची लढत असताना रावेरमध्ये चित्र वेगळेच असून, बुकींच्या मते रावेरमध्ये एकतर्फी लढत होणार असून, विद्यमान खासदार रक्षा खडसे या मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचा अंदाज बुकींकडून वर्तविण्यात आला आहे. उमेदवार निवडीपासूनच बुकींची पसंती ही भाजपाच्या उमेदवार रक्षा खडसे यांनाच होती. डॉ.उल्हास पाटील यांना उशीराने देण्यात आलेली उमेदवारी, मोदी फॅक्टर, प्रचारयंत्रणा यावर खडसे डॉ.पाटील यांच्यापेक्षा सरस ठरत आहेत. रक्षा खडसे यांच्यावर २५ ते ३५ पैशांचा भाव आहे. तर उल्हास पाटील यांच्यावर २ ते ३ रुपये इतका भाव आहे. बुकींच्या मते ही जागा मोठ्या मताधिक्याने भाजपाच्या खात्यात जाण्याची शक्यता आहे.
नंदुरबारमध्ये गावोगावी लागल्या पैजा
नंदुरबार लोकसभा निवडणूक निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे़ उत्सुकतेपोटी अनेकांनी लाखो रुपयांच्या पैजा लावल्या आहेत़ नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार डॉ़ हीना गावीत आणि काँग्रेसचे आमदार अॅड़ के़सी़पाडवी यांच्यात खरी लढत होती़ दोघांच्या कार्यकर्त्यांकडून प्रचार केल्यानंतर मतदानाची आकडेवारी वाढून चुरशीला अधिक वाव मिळाला होता़ राज्यातील इतर भागाप्रमाणे आॅनलाईन बेटींग या प्रकारातही नंदुरबार जिल्हा बऱ्यापैकी मागास असल्याचे चित्र लोकसभा निवडणूक निकालाच्या बेटींगवरुन दिसून येत आहे़ एकमेकांमध्ये पैजा लावून पैसा पणाला लावणाºया बºयाच जणांना आॅनलाईन बेटींग जमत नसल्याचे सांगण्यात आले आहे़ बेटींगमधील एकाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्रीय मंत्री आणि बेटर्सची पसंती असलेले माणिकराव गावीत यांना पराजित करणाºया हिना गावीतांना यंदा सर्वाधिक पसंती आहे़ विविध बेटींग साईटसवर त्यांच्या विजयी निकालावर १़१२ ते ३़१५ पैश्यांपर्यंत पसंती आहे़ हे सर्वाधिक चढे दर असल्याचे सांगण्यात आले आहे़ त्यांच्यावर रक्कम लावणे वाढल्यास निकालानंतर बुकींना आर्थिक फटकाही बसू शकतो़ लाख रुपये लावल्यास कमीतकमी १ लाख १२ हजार किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम मिळू शकते़ या निकालावर मोठी रक्कम लागली आहे़
मताधिक्यावर देखील लावण्यात आला सट्टा
उमेदवार निवडीसोबत कोणत्या उमेदवाराला किती मतदान मिळेल यावर देखील बोली लावण्यात आल्या आहेत. तसेच एखाद्या उमेदवाराचा पराभव झाला तर त्यामधील किती मताधिक्यांचा फरक राहील यावर देखील बोली लावण्यात आली आहे. यासह मतदार संघात येणाºया विधानसभा मतदार संघात मिळणारी मते, यावर देखील लाखोंचा सट्टा लावला आहे. मतमोजणीच्या दिवशी फेरीनिहाय मतमोजणीवर देखील देखील बुकींचे लक्ष राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, २३ रोजी सट्टा बाजारात कोट्यवधीची उलाढाल होण्याची शक्यता आहे.
धुळ्यातही लागलाय सट्टा
लोकसभेच्या धुळे मतदार संघात कोण जिंकणार आणि कोण हरणार या संदर्भात सट्टा खेळला जात आहे. या अनुषंगाने पोलीस सज्ज झाले आहेत़ पोलीस अधीक्षक पांढरे यांनी पोलिसांचे तात्पुरते पथक देखील स्थापन केले असून त्यांना शहरासह जिल्ह्यात फिरुन कुठे अनुचित प्रकार होतो आहे का, कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते का, याकडे बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़
आतापर्यंत खरे ठरले आहेत अनेक अंदाज
सट्टा बाजाराने आतापर्यंत लावण्यात आलेल्या अंदाजाचे अनेक अंदाज खरे ठरले आहेत. २०१४ मधील लोकसभा व विधानसभेचे निकाल खरे ठरले होते. तर २०१८ मध्ये जळगाव मनपाचे काही प्रभागांचे निकाल देखील जवळपास खरे ठरले होते.
जळगावात अटी-तटीची लढतीची शक्यता
जळगाव लोकसभा मतदार संघात उन्मेष पाटील व गुलाबराव देवकर यांच्या काट्याची लढत होण्याची शक्यता आहे. तीन टप्प्यात बुकींकडून सट्टा लावण्यात आला आहे. यामध्ये निवडणुकीच्या पुर्वी म्हणजेच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दोन्ही उमेदवारांवर सट्टा लावण्यात आला होता.
त्यानंतर मतमोजणी नंतर तर देखील सट्टा लावण्यात आला, आता निकालाला काही दिवस बाकी असताना राजकीय पदाधिकारी व नागरिकांचा मते घेवून देखील सट्टा लावण्यात आला आहे. यामध्ये तीन्ही टप्प्यात दोन्ही उमेदवारांवर लावण्यात आलेल्या बोलीवर तफावत दिसून येत आहे.
मतदानाआधी उन्मेष पाटील यांच्यावर ५० ते ६० पैश्यांचा भाव होता. तर गुलाबराव देवकर यांच्यावर २५ ते ४५ पैशांपर्यंतचा भाव होता. मतदानानंतर उन्मेष पाटील २५ पैसे तर देवकरांवर ३५ ते ४० पैसे भाव लावला होता. सध्या उन्मेष पाटील २५ ते ५० तर देवकर यांचा भाव ७५ पैसे तर १ रुपयापर्यंत आहे.