भाजपामध्ये बुध्दिभेदाची राष्टÑवादी रणनिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:23 PM2019-01-20T12:23:39+5:302019-01-20T12:25:20+5:30
लोकसभा निवडणुकीत भाजपाला दोन्ही काँग्रेसचा सामना करावा लागणार आहे. भाजपा सत्तेत असल्याने दुर्गुणाची लागण झाली आहेच. नेत्यांमध्ये मतभेद आहेत. नेमक्या याच मुद्यावरुन राष्टÑवादी काँग्रेस बुध्दिभेद करण्याची रणनिती आखत आहे.
मिलिंद कुलकर्णी
राष्टÑवादी काँग्रेसने जळगाव जिल्ह्यातील दोन मतदारसंघात निवडणूक लढविण्याचे निश्चित केलेले दिसत आहे. परिवर्तन यात्रेत झालेल्या पाच सभांच्या नियोजनावरुन ते स्पष्ट झाले. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय गिरीश महाजन यांच्यावर टीकास्त्र आणि भाजपामधील असंतुष्ट नेते एकनाथराव खडसे यांच्याविषयी सहानुभूती दाखवून मोठी खेळी खेळली गेली. यात्रा, सभा चांगल्या झाल्या. परंतु, संघटनात्मक पातळीवर पक्षाची बांधणी कशी होणार हा कळीचा मुद्दा कायम राहिला आहे. मतभेद, मनभेद कायम आहेत.
भारतीयजनता पक्षाला सत्तेत येऊन पावणे पाच वर्षे होत आली. प्रत्येक सत्ताधारी पक्षामध्ये जे अवगुण शिरतात, ते भाजपामध्येही शिरले. प्रमाण कमी की जास्त याविषयी वाद उद्भवू शकतो, पण अवगुण शिरले आहेत. २०१४ ची लाट ही पक्षाची मूळ ताकद आहे, असे समजून भाजपाने पुढे त्याच कार्यपध्दतीतून इतर निवडणुका लढल्या. निष्ठावंत कार्यकर्त्यांना बळ देण्यापेक्षा ‘इलेक्टीव मेरिट’ असलेल्या दुसऱ्या पक्षांमधील उमेदवारांना आयात करुन निवडणुका जिंकल्या. यश मिळाले तरी अडचणी वाढल्या. पक्ष अनेक वर्षे विरोधात असतानाही निष्ठावंत कार्यकर्ते पक्षासोबत राहिले होते. आता केंद्र, राज्यात सत्ता असूनही पक्षाने ‘आयात’ धोरण राबविल्याने निष्ठावंत नाराज आणि महत्त्वाकांक्षी आयारामांनी पक्ष बदलला तरी ‘गुण’ कायम ठेवल्याने फंदाफितुरी, मतभेदांची लागण अशा दुहेरी पेचात भाजपा अडकला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेला लागलेली ओहोटी, केंद्र व राज्य सरकारची काही चुकीची धोरणे, तीन राज्यातील पराभव, विरोधी पक्षांच्या महागठबंधनची मोर्चेबांधणी या घडामोडींचा सुगावा पहिल्यांदा लागला तो भाजपामधील ‘आयारामां’ना. लोकसभा-विधानसभा निवडणुकीतील बदलत्या हवेचा अंदाज घेऊन या नेत्यांनी चाचपणी सुरु केली आहे. कुणाला ‘स्वगृहा’ची आठवण येत आहे, तर काहींना आवतण येत आहे. त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेस करीत आहे.
राष्टÑवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेतील पाच सभा आणि अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्या भाषणांमधून भाजपामध्ये बुध्दिभेद निर्माण करण्याची रणनीती आखल्याचे स्पष्ट दिसून आले. खान्देशातील भाजपाचे नेतृत्व आता एकनाथराव खडसे यांच्याकडून गिरीश महाजन यांच्याकडे आले आहे. त्यामुळे महाजन यांना लक्ष्य करीत खडसेंना सहानुभूती दाखविली जात आहे. महाजन हे प्रभावशाली नेतृत्व बनल्याने त्यांच्याभोवती लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील इच्छुकांचा गराडा आहे. मात्र यात आयाराम, निवृत्त शासकीय अधिकारी यांचा भरणा अधिक असल्याने निष्ठावंतांमध्ये नाराजी आहेच. खडसेंवरील अन्यायाविषयी पुन्हा पुुन्हा बोलून निष्ठावंत आणि खडसे समर्थकांशी जवळीक वाढविण्याचे प्रयत्न राष्टÑवादीकडून केले जात आहे.
भाजपाने ही खेळी लक्षात घेऊन वेळीच सावध होण्याची आवश्यकता आहे. परंतु, भाजपाचा रथ सध्या जमिनीपासून चार बोटे हवेत असल्याने नेते आणि कार्यकर्ते स्वप्नरंजनात मश्गुल आहेत.
राष्टÑवादीचा बुध्दिभेदाचा प्रयत्न यशस्वी झाला, तर मात्र हा रथ जमिनीवर यायला वेळ लागणार नाही. कारण, पावणेपाच वर्षात सत्तेचा लाभ हा काही ठराविक नेते आणि कार्यकर्त्यांपर्यंतच सीमित राहिला. सामान्य कार्यकर्ता अजूनही सतरंज्या उचलण्याचे आणि मतदार यादीतील पानाची जबाबदारी घेण्यापुरता शिल्लक आहे. पक्षाचे संघटन मजबूत असल्याचा दावा करणारे दिग्गज याच सामान्य कार्यकर्त्याच्या बळावर बढाया मारत आहेत. परंतु, मंत्री, नेते, लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या प्रभावळीतील कार्यकर्त्यांच्या उक्ती, कृती आणि सांपत्तिक स्थितीत गेल्या पाच वर्षात झालेला बदल हा सामान्य कार्यकर्त्याच्या नजरेतून सुटणारा नाही. ‘गल्ली ते दिल्ली’ असा शतप्रतिशतचा नारा देताना ज्यांच्या खांद्यावर पक्षाचा झेंडा आहे, तोच जर असंतुष्ट, नाराज असेल तर भूईसपाट व्हायला वेळ लागत नाही. काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेसने पाच वर्षांपूर्वी याचा अनुभव जवळून घेतला आहे.
गिरीश महाजन, डॉ.सुभाष भामरे, जयकुमार रावल यांना पक्षाने मंत्रिपद दिले. सत्ता आणि ताकद दिली. निवडणुका जिंकल्याचा आनंद आहेच, पण खान्देशच्या विकासाचे काय? राजधानी एक्सप्रेसचा थांबा मिळाला म्हणून मिरवणूक काढली जात असेल तर विमानसेवा बंद पडली, महामार्गाचे काम बंद पडले, धुळे-मनमाड रेल्वेचे काम सुरु झाले नाही, तेव्हा ‘शोक’ व्यक्त केला का? असा प्रश्न आता जनता विचारेल.
भाजपामधील स्थितीविषयी काँग्रेस-राष्टÑवादीने आनंद मानण्यात काहीही हशील नाही? स्वत:कडे सक्षम उमेदवार का नाही? पुन्हा आयारामची वाट का बघावी लागत आहे, याचा विचारही पक्षश्रेष्ठींनी करायला हवा.
भाजपातील खांदेपालट हेरुन राष्टÑवादीने गिरीश महाजन यांना लक्ष्य केले आहे. जळगाव, धुळे आणि नगर महापालिका निवडणुकीतील विजयामुळे राष्टÑवादीला धक्का बसला आहे. त्यातच महाजन यांच्या ‘बारामती’च्या वक्तव्यामुळे पवार काका-पुतणे दुखावले गेलेले दिसतात. जलसंपदा विभागातील गैरव्यवहाराची टांगती तलवार कायम असल्याने राष्टÑवादी काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकेचा रोख ठेवला आहे.
पक्के राजकारणी
एकनाथराव खडसे हे विरोधी पक्षनेते असताना आघाडी सरकारचे वाभाडे काढत असत, त्यावेळी राष्टÑवादी काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांनी ‘तोडपाणीवाले विरोधी पक्षनेते’ अशी मल्लिनाथी केली होती. आता पक्षावर नाराज असल्याने खडसेंविषयी राष्टÑवादीच्या प्रदेशाध्यक्षांसह नेते सहानुभूती व्यक्त करीत आहेत. राष्टÑवादीची नीती खडसे निश्चितच ओळखून असतील.