भाजप जळगाव जिल्हाध्यक्ष बदलाच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:44 PM2019-04-12T12:44:41+5:302019-04-12T12:45:15+5:30
अमळनेर घटनेचे पडसाद
जळगाव : अमळनेरात पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील यांच्यावर जलसंपदा मंत्र्यांच्या समोर व्यासपीठावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकाराची पक्ष पातळीवरून गंभीर दखल घेतली जाण्याचे संकेत आहेत. तर दुसरीकडे पक्षाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे पद अडचणीत आले असल्याचे बोलले जात आहे. याबाबत राज्यस्तरीय नेत्यांनी घटनेची माहितीही घेतली आहे.
भाजप अंतर्गत कलहाचे पडसाद बुधवारी अमळनेरात भाजपच्या मेळाव्यात उमटले. पत्नीबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करून उदय वाघ व त्यांच्या समर्थकांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर डॉ. बी.एस. पाटील यांना लाथाबुक्क्याने तुडवले. याबाबतचे चित्रण सोशल मिडियावर काल व आजही दिवसभर फिरत होते.
घटनेची केली जातेय चौकशी
भारतीय जनता पक्ष पातळीवर अमळनेच्या घटनेची बुधवारी सायंकाळी व गुरूवारी विविध पातळ्यांवर माहिती घेतली जात आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून माहिती घेतल्याचे समजते. तर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांनी सह संघटन मंत्री अॅड. किशोर काळकर यांच्याकडे चौकशी करून माहिती घेतल्याचे वृत्त आहे. मतदान प्रक्रिया संपताच वाघ यांची गच्छती केली जाण्याचे संकेत आहेत. वाघ यांच्या जागी यापूर्वी अध्यक्षपदाची धुरा जि.प. चे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर किंवा जामनेरचे गोविंद अग्रवाल यांना संधी दिली जाण्याचेही बोलले जात आहे.
डॅमेज कंट्रोलसाठी मुख्यमंत्री येणार
अमळनेरातील घटनेच्या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोलसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमळनेरात १८ किंवा १९ एप्रिल रोजी सभा घेण्याचे भाजप पक्ष पातळीवर नियोजन सुरू झाले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
दोन टर्म अध्यक्षपद
भाजप जिल्हाध्यक्षपदाचा आढावा घेता १९८० ते २०१९ या कालावधीत सर्वाधिक काळ जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी चाळीसगावच्या अॅड. शिवाजीराव पालवे यांच्याकडे होती. ते १९८४ ते १९९१ या काळात सलग सात वर्षे अध्यक्ष होते. त्या खालोखाल २०१३ ते २०१९ असे सलग सहा वर्षे म्हणजे दोन टर्म अध्यक्षपदाची संधी उदय वाघ यांना मिळाली आहे. जानेवारीत पक्षांतर्गत निवडणुकांच्या हालचाली होत्या मात्र निवडणुकांमुळे त्यांना मुदतवाढ मिळाली आहे.