"महाराष्ट्राची जनता ५० वर्षांपासून...'; अमित शाह यांच्याकडून पहिल्याच सभेत पवारांवर शाब्दिक हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 06:32 PM2024-03-05T18:32:29+5:302024-03-05T18:32:47+5:30
अमित शाह यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरूनही शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना फटकारलं आहे.
BJP Amit Shah ( Marathi News ) : भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जळगाव येथील जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "विरोधी पक्षांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचा हिशेब मागितला जातो. पण मी शरद पवार यांना सांगू इच्छितो की, मोदी हे पंतप्रधान होऊन १० वर्ष झाली आहेत. मात्र महाराष्ट्राची जनता गेल्या ५० वर्षांपासून तुमचा भार वाहत आहे. तुम्ही त्या ५० वर्षांचा सोडा, मात्र फक्त पाच वर्षांचा तरी हिशेब जनतेला द्या," अशा शब्दांत अमित शाह यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं आहे.
राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली गट भाजपसोबत सत्तेत गेला असला तरी पक्षाचे संस्थापक शरद पवार हे मात्र विरोधकांच्या इंडिया आघाडीसोबत ठामपणे उभे राहिले आहेत. त्यामुळे भाजपचे केंद्रातील नेते महाराष्ट्रात आल्यानंतर शरद पवार यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. अशातच अमित शाह यांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकताना आपल्या पहिल्याच सभेत पवारांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. तसंच घराणेशाहीच्या मुद्द्यावरूनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही फटकारलं आहे.
जळगावच्या सभेत बोलताना अमित शाह म्हणाले की, "ज्या पक्षांमध्ये लोकशाही नाही ते घराणेशाही असणारे पक्ष आहेत. हे पक्ष देशात लोकशाही ठेवतील का? काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना राहुल गांधींना पंतप्रधान करायचं आहे. उद्धव ठाकरेंना आपला मुलगा आदित्य ठाकरेना मुख्यमंत्री करायचं आहे. शरद पवारांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचं आहे, ममता बॅनर्जींना आपल्या भाच्याला मुख्यमंत्री करायचं आहे, स्टॅलिन यांना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे. मग या सगळ्या नेत्यांपैकी तुमच्यासाठी कोण आहे? तुमच्यासाठी कोणी असेल तर ते फक्त नरेंद्र मोदी हेच आहेत," असं अमित शाह म्हणाले.
महाविकास आघाडीची उडवली खिल्ली
महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीसमोर लोकसभा निवडणुकीत आव्हान उभं केलं आहे. या महाविकास आघाडीवर निशाणा साधताना अमित शाह म्हणाले की, "राज्यात ३ चाकाची महाविकास आघाडीची ऑटो चालते, तिचे तिन्ही टायर पंक्चर झाले आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगले काम करत आहेत. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुविधा दिल्या. १ लाख मुलं डॉक्टर बनतील. आत्मनिर्भर आणि विकसित भारताचा निर्धार या निमित्ताने भाजपकडून करण्यात येत आहे. भारत मातेला विश्वगुरुच्या स्थानावर पोहचवण्यासाठी भाजपला साथ द्या," असं आवाहन शाह यांनी उपस्थित नागरिकांना केलं आहे.