'एकनाथ खडसे यांचे पक्षांतर होणार हे सत्य'; ठाकरे सरकारमधील मंत्र्याचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 03:39 PM2020-10-11T15:39:53+5:302020-10-11T15:47:36+5:30
गुलाबराव पाटील हे रविवारी अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे आले असताना ते बोलत होते.
जळगाव: भाजपचे माजी मंत्री एकनाथराव खडसे हे सध्या कोणाच्या संपर्कात आहेत, या बद्दल मला माहिती नाही, मात्र ते पक्षांतर करतील हे सत्य आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे प्रवक्ते तथा सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी जळगावात केले.
गुलाबराव पाटील हे रविवारी अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे आले असताना ते बोलत होते. एकनाथराव खडसे यांच्या पक्षांतराची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांनी वरील विधान करीत खडसे यांच्या पक्षांतराचे संकेत दिली. तसेच त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर खडसे राष्ट्रवादीत जाणार की शिवसेनेत जाणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
शिवसेनेत तर जाणार नाहीत खडसे ?
मुंबईत खडसे यांची राष्ट्रवादी प्रवेशाबाबत शरद पवार यांच्या सोबत भेट होणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु, मुंबईत चार दिवस थांबून असताना खडसे आणि शरद पवार यांच्यात भेट झाली नाही. मध्यंतरी खडसे यांनी शिवसेनेत यावे, असा आग्रह शिवसेनेच्या नेत्यांकडून होत होता. त्यात मंत्री अब्दुल सत्तार, उदय सामंत यांच्यासह स्वतः गुलाबराव पाटील यांनी खडसे यांना शिवसेना प्रवेशाचे आमंत्रण दिले होते. मात्र, खडसे यांनी याबाबत कोणतेही मत व्यक्त केले नव्हते.
त्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या जळगावातील नेत्यांना मुंबईत बोलावून घेत त्यांच्यासोबत बैठक घेऊन खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चाचपणी केली होती. तेव्हापासून खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू आहे. मात्र, मुंबई दौरा केल्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात काही हालचाली झाल्या नाहीत. या साऱ्या घडामोडी पाहता राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा रंगवून खडसे मागच्या दाराने शिवसेनेत तर जाणार नाहीत ना? अशीही चर्चा आता रंगू लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर रविवारी गुलाबराव पाटील यांनी दिलेली सूचक प्रतिक्रिया खडसे यांच्या शिवसेना प्रवेशाचे संकेत आहे की काय, अशीही चर्चा सुरू आहे.
खडसे यांच्या भूमिकेकडे लक्ष
मुंबईत असताना एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत भेटीगाठी न होणे, त्यानंतर खडसे मुंबईतून जळगावात परतल्यानंतर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी 'खडसे पक्षांतर करतील हे सत्य आहे', असे वक्तव्य करणे यामुळे आता खडसे यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा रंगत आहे. या साऱ्या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात खडसे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.