जि.प.तील समित्यांची यादी एका भाजपा नेत्याकडे
By admin | Published: April 22, 2017 01:02 PM2017-04-22T13:02:20+5:302017-04-22T13:02:20+5:30
कुठल्या सदस्याला कुठल्या समितीवर घ्यायचे हे निश्चित करण्यासंबधी भाजपाच्या एका नेत्याकडे ही यादी असून, याच नेत्याकडे नियोजन सुरू असल्याची माहिती आहे.
जळगाव : जिल्हा परिषदेतील 10 समित्यांवर कुठल्याही सदस्याची नियुक्ती शुक्रवारीही झाली नाही. परंतु कुठल्या सदस्याला कुठल्या समितीवर घ्यायचे हे निश्चित करण्यासंबधी भाजपाच्या एका नेत्याकडे ही यादी असून, याच नेत्याकडे नियोजन सुरू असल्याची माहिती आहे.
या नेत्याकडे जि.प.तील विरोधी पक्षातील एक गट अलीकडेच जाऊन आला. या गटालाही कुठलीही माहिती संबंधित नेत्याकडून मिळाली नाही. चहा, पाण्याविना या गटाला संबंधित नेत्याच्या निवासस्थानातून परतावे लागल्याची कुजबूज जि.प.मध्ये सुरू आहे.
समित्यांवर सदस्यांच्या नियुक्तीचे अधिकार गटनेत्यांनी अध्यक्ष यांना दिल्याने आपली कुठल्या समितीवर नियुक्ती झाली याची माहिती घेण्यासाठी मात्र अनेक सदस्य अध्यक्ष यांच्या जि.प.तील कार्यालयात येत आहेत. भाजपातील एक गट अलिप्त
समित्यांमध्ये सदस्य नियुक्ती झालेली नसतानाच येत्या 29 रोजी स्थायी समितीची सभा निश्चित केली आहे. सदस्य नसले तर ही सभा तहकूब होईल.
समित्यांवर सदस्यांच्या नियुक्तीवरून भाजपामध्ये गटबाजी वाढली असून, एका गटातील सदस्यांनी या प्रक्रियेपासून दूर राहणेच पसंत केले आहे. समितीवर नियुक्तीसंबंधी नियोजन करीत असलेल्या नेत्याकडे या गटातील कुठलाही सदस्य गेलेला नाही. अर्थातच यामुळे भाजपातील एका गटाला स्थायी, बांधकाम व जलव्यवस्थापन या महत्त्वाच्या समित्यांपासून दूर ठेवण्याची खेळी सुरू असल्याची माहिती आहे.