भाजपा नेत्यांना आत्मपरीक्षणाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:15 AM2021-03-22T04:15:01+5:302021-03-22T04:15:01+5:30
सुशील देवकर मनपात असलेल्या राक्षसी बहुमतानंतरही शहरातील समस्यांवर संवेदनील राहून तोडगा काढण्यात झालेले दुर्लक्ष, आपल्या वॉर्डातील कामे होत नसल्याने ...
सुशील देवकर
मनपात असलेल्या राक्षसी बहुमतानंतरही शहरातील समस्यांवर संवेदनील राहून तोडगा काढण्यात झालेले दुर्लक्ष, आपल्या वॉर्डातील कामे होत नसल्याने नाराजी व्यक्त करणाऱ्या नगरसेवकांकडे केलेले दुर्लक्ष किंबहुना त्यांना हिशेबात न धरण्याची केलेली चूकच भाजपाला भोवली असल्याचे मनपातील सत्तांतर नाट्यातून दिसून आले आहे. बंडखोर नगरसेवकांनी तर थेटपणे आमदार सुरेश भोळे यांचे नाव घेत नाराजी व्यक्त केली तर पक्षाचे संकटमोचक गिरीश महाजन यांनीही या नगरसेवकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचेही स्पष्ट केले. आमदार भोळे यांनी अगदी मुलाची शपथ घेत कुणालाही वाईट किंवा अरेरावीने बोललो नसल्याचे स्पष्ट केले. त्यांचा स्वभाव बघता त्यात तथ्य आहे. मात्र निर्णय प्रक्रियेत नगरसेवकांना स्थान डावलण्याचा प्रकार आमदार भोळे व आमदार गिरीश महाजन यांच्याकडून झाला, हे स्पष्ट आहे. किंबहुना या नगरसेवकांना भाजपाने निवडून आणले, याच अभिमानात जनतेतून निवडून आलेल्या नगरसेवकांना दुर्लक्षित करण्याची चूक केली. या नगरसेवकांना मात्र कामे होत नसल्याने पुढील अडीच वर्षात तरी कामे करून पुढील निवडणुकीत जनतेला सामोरे जाता यावे, हाच उद्देश होता. तो जर भाजपाच्या नेतृत्वानेच त्यांच्या भावना समजून घेत सोडविला असता तर कदाचित ही वेळ आली नसती. अर्थात हे अगदी वरवरचे झाले. प्रत्यक्षात निविदांचे, ठेक्यांचे घोळ, त्यावरून होत असलेले भेदभाव हे देखील या नाराजीच्या आगीत तेल ओतणारे ठरले असल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक या नगरसेवकांना भाजपाने निवडून आणले अशा आविर्भावात भाजप नेते वावरत राहिले, अजूनही त्याच आविर्भावात आहेत. मात्र जर पक्षाच्याच बळावर निवडून आणले तर मग बाहेरच्या पक्षातील उमेदवारांची आयात करण्याची गरजच त्यावेळी भाजपला पडली नसती. त्यामुळे या बंडखोरांपैकी जे बाहेरून भाजपात आलेले होते, त्यांचे त्यांच्या प्रभागात थोडेफार तरी नाव होते. त्याला भाजपचे पाठबळ मिळाल्याने ते निवडून आले एवढे जरी समजून भाजप नेते वागले असते तर कदाचित ही वेळ आली नसतील. तसेच महापालिका निवडणुकीच्यावेळी १ वर्षात जळगाव शहराचा कायापालट करण्याचे जाहीर आश्वासनही माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी दिले होते. मात्र अडीच वर्ष उलटूनही शहराचा विकास होण्याऐवजी रखडलेल्या विकासकामांमुळे भकास झालेले, धुळीचे शहर असेच चित्र निर्माण झाले. मात्र अडीच वर्षात माजी मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत गांभीर्याने लक्ष घातलेले दिसून आले नाही. जनतेलाही गृहित धरण्याचा प्रकारच त्यातून झाला. त्यामुळे जनतेतही नाराजी व्यक्त होऊ लागली होती. त्याची जाणीव ज्या नगरसेवकांना झाली, त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेत सेनेच्या गोटात धाव घेतली. आधीची खान्देश विकास आघाडीच आता शिवसेनेच्या रूपाने सत्तेत आली आहे. त्यामुळे त्यांना मनपाच्या कारभाराच्या खाचाखोचा चांगल्याच ठावूक आहेत. त्या ज्ञानाचा उपयोग करीत लोकांना दिलासा देणारी कामे तातडीने होणे अपेक्षित आहे. अन्यथा त्यांना निवडणुकीत लोकांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल, हे निश्चित.