"त्या" नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी भाजपकडून केली जाते कागदपत्रांची जुळवाजुळव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:14 AM2021-03-24T04:14:31+5:302021-03-24T04:14:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीआधी सत्ताधारी भाजपमधून फुटलेल्या २७ नगरसेवकांमुळे महापालिकेत ऐतिहासिक सत्तांतर झाल्यानंतर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीआधी सत्ताधारी भाजपमधून फुटलेल्या २७ नगरसेवकांमुळे महापालिकेत ऐतिहासिक सत्तांतर झाल्यानंतर महापौरपद शिवसेनेला मिळाले आहे. आता फुटलेल्या सत्तावीस नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरू झाल्या असून, त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू करण्यात आल्याची माहिती भाजपच्या विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.
महापौर व उपमहापौर निवडणुकीत भाजपकडून व्हीप काढल्यानंतरही या नगरसेवकांनी भाजपच्या अधिकृत उमेदवारांना मतदान न करता शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवार जयश्री महाजन व भाजपमधील बंडखोर नगरसेवक तथा विद्यमान उपमहापौर कुलभूषण पाटील यांना मतदान केले होते. यामुळे आता फुटलेल्या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. यासाठी भाजपचे नगरसेवक ॲड. शुचिता हाडा, विशाल त्रिपाठी यांच्यासह अजून दोन नगरसेवक कामाला लागले आहेत. या नगरसेवकांकडून फुटलेल्या नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव केली जात आहे. तसेच पुढील आठवड्यातच नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव तयार करून विभागीय आयुक्तांकडे रवाना करण्यात येणार असल्याचीही माहिती भाजपच्या सुत्रांनी दिली आहे. तसेच याबाबत काही कायदेशीर बाबीही तपासल्या जात असल्याचीही माहिती सुत्रांनी दिली आहे.
गट तयार झाला तरीही अपात्रतेची कारवाई अटळ ?
भाजपच्या एका नगरसेवकाने दिलेल्या माहितीनुसार फुटलेल्या नगरसेवकांचा स्वतंत्र गट तयार होणे कठीण आहे. भाजपच्या ५७ नगरसेवकांपैकी ३८ नगरसेवक फुटणे आवश्यक होते. मात्र, यापैकी २७ नगरसेवक फुटले असून, भाजपकडे अजूनही ३० नगरसेवक आहेत. फुटलेल्या नगरसेवकांनी काही नगरसेवक फोडून ३८ पर्यंतचा आकडा गाठला तरीही फुटलेल्या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई ही अटळ असल्याची माहिती भाजपच्या एका नगरसेवकाने दिली आहे. पक्षाकडून याबाबत काही विधितज्ज्ञांचादेखील सल्ला घेतला जात असल्याची ही माहिती भाजपकडून देण्यात आली आहे.