भाजप आमदार भोळे यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या मद्य दुकानांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 12:38 PM2020-05-03T12:38:25+5:302020-05-03T12:39:22+5:30
तफावत आढळल्याने सहाही फर्मवर विभागीय गुन्हा
जळगाव : भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्या कुटुंबियांच्या नावावर असलेले मद्य विक्री दुकान व गोदामांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी छापे घातले. यासह सहा बड्या व्यावसायिकांच्या दुकानावर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. साठ्यात तफावत आढळल्याने या सहाही फर्मवर विभागीय गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी व माजी महापौर सीमा भोळे यांच्या नावावर असलेल्या नवी पेठेतील नीलम वाईन्स, मुलगा विशाल सुरेश भोळे यांच्या नावावर असलेले नशिराबाद येथील रामा ट्रेडर्स, त्याशिवाय दिनेश नोतवाणी यांच्या मालकीचे नशिराबाद येथील विजय सेल्स, गुजराल पेट्रोल पंपाजवळील एन.एन.वाईन्स, गिरणा पुलाजवळील विनोद वाईन्स व नंदू आडवाणी यांच्या मालकीचे पाळधी येथील सोनी ट्रेडर्स या सहा दुकानांची तपासणी करण्यात आली. निरीक्षक संजय कोल्हे, किरण पाटील, नरेंद्र दहिवडे, दुय्यम निरीक्षक विकास पाटील, सागर वानखेडे व्ही.एम.माळी यांच्यासह नाशिकचे भरारी पथकाकडून ही तपासणी करण्यात आली.
मद्य व्यावसायिकांमध्ये कुरघोड्यांचे राजकारण
आर.के.वाईन्स व क्रिश ट्रेडर्स य मद्य विक्रीच्या आस्थापनांवर कारवाई झाल्यानंतर दोन जिल्ह्यातील मद्य व्यावसायिकांमध्ये आता कुरघोडीचे राजकारण सुरु झाले आहे. जळगावात झालेल्या कारवाईचा वचपा काढण्यासाठी नंदूरबारात एका मद्याच्या दुकानाची तपासणी झाली. त्यानंतर त्याच व्यावसायिकाचे जळगावातही मद्याचे दुकान आहे. शनिवारी त्या दुकानाचीही तपासणी झाली. मद्य व्यवसायात किंग समजले जाणारे हे व्यावसायिक आपले स्थान निर्माण करण्यासाठी एकमेकाचे पत्ते कापायला निघाले असून त्यातूनही कारवाया होत असल्याची चर्चा मद्य व्यावसायिकांमध्ये सुरु आहे.
जळगाव शहर व नशिराबादमधील प्रत्येकी दोन,बांभोरी व पाळधी येथील प्रत्येकी एक अशा सहा मद्य विक्री आस्थापनांची दिवसभर तपासणी झाली. यात मद्यसाठ्यात कमी अधिक तफावत आढळून आली. काही ठिकाण नोंदी अपूर्ण होत्या. त्यामुळे सर्व आस्थापनांवर विसंगतीचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पुढील कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात येईल.
-नितीन धार्मिक, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क