"खडसेंना जर खोटं बोलणं मोजण्याच्या मशिनीसमोर बसविलं तर मशिनही बंद पडेल"
By Ajay.patil | Published: August 2, 2022 07:52 PM2022-08-02T19:52:52+5:302022-08-02T19:52:58+5:30
आमदार मंगेश चव्हाण यांचा टोला
अजय पाटील, जळगाव: जिल्हा दूध उत्पादक संघाचा खडसे परिवाराने स्वत:ची प्रॉपर्टी म्हणून वापर केला असून, त्यांच्या कार्यकाळात दूध संघ पुर्णपणे राजकीय अड्डा करण्यात आला. आता त्यांनी केलेल्या भ्रष्ट्राचाराचा पिक्चर आम्ही टप्प्याटप्प्याने दाखवणार. या पिक्चरनंतर खडसे परिवाराला पळता भुई थोडी होणार असल्याचा गौप्यस्फोट जिल्हा दूध संघाचे मुख्य प्रशासक आमदार मंगेश चव्हाण यांनी केला. दूध संघात मंगळवारी संचालक मंडळाने बैठक घेतल्यानंतर मुख्य प्रशासक म्हणून मंगेश चव्हाण यांनी ही बैठक संपल्यानंतर प्रशासक मंडळाच्या सदस्यांसोबत चर्चा केली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. यावेळी, खडसेंना जर खोटं बोलण्याचं मोजणी करणाऱ्या मशिनीसमोर बसविले तर मशिनही बंद पडेल, असा टोलाही त्यांनी लगावला.
खडसे परिवाराकडून दूध संघाचा स्वत:ची प्रॉपर्टी म्हणून वापर झाल्याचा आरोप
"दूध संघात मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार झाला असून, तो भ्रष्ट्राचार आम्ही बाहेर काढणार आहोत. मंदाकिनी खडसे यांनी नियमानुसार व आपली नैतिकता दाखवून वर्षभरापुर्वीच राजीनामा द्यायला हवा होता. मात्र, त्यांनी ती नैतिकता दाखवली नाही, त्यांनी याआधी अनेकवेळा पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, राजीनामा दिलाच नाही. आम्ही शासनाच्या आदेशानुसारच दूध संघाचा पदभार घेतला असून, आम्हाला या प्रकरणात कोणताही संभ्रम नसून, आम्ही नियमात व न्यायालयाच्या आदेशानुसारच कारभार करणार", असे मंगेश चव्हाण यांनी सांगितले. यावेळी दूध संघाचे प्रशासक मंडळातील सदस्य अरविंद देशमुख, अजय बढे हे देखील उपस्थित होते.
खोटं बोलण्याचं मोजणी करणाऱ्या मशिनीसमोर बसविले तर मशिनही बंद पडेल!
"एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या परिवारातील सदस्यांना खोटं बोलण्याची सवय आहे. 'खोटं बोल मात्र ते रेटून बोल' अशीच पद्धत त्यांची आहे. त्यांना जर खोटं बोलणं मोजणी करणाऱ्या मशिनसमोर बसविले तर ते मशिन देखील बंद पडेल", असा टोला मंगेश चव्हाण यांनी खडसेंना लगावला. "आम्ही नियमानुसार कार्यकारी संचालकांकडून पदभार घेतला असून, सहकारी संस्थाचे नाशिक विभागीय उपनिबंधक सुरेंद्र तांबे यांच्या आदेशानुसारच पदभार घेतला असल्याने बेकायदेशीर म्हणण्याचा संबंध येत नाही", असेही आमदार चव्हाण यांनी स्पष्ट केले.