भाजपाचे आमदार, खासदार ‘टिष्ट्वटर’वर झाले ‘चौकीदार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 11:23 AM2019-03-20T11:23:01+5:302019-03-20T11:23:57+5:30
चार आमदारांनी नाही केला बदल
जळगाव/नंदुरबार : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या ‘चौकीदार चोर है’ या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाकडून यंदाच्या निवडणुकीत ‘मै भी चौकीदार’ या टॅगलाईनने प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील भाजपाचे दोन्ही खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांनी देखील व्टिटरवर आपल्या नावापुढे चौकीदार शब्द वाढवून घेतला आहे. मात्र, फेसबूकच्या पेजवर कोणताही बदल पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेला नाही. तर नंदुरबारचे आमदार व खासदार यापासून दूरच असल्याचे दिसून आले.
कॉग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल करारात घोटाळ्याचे आरोप करत, ‘देश का चौकीदार चोर है’ असा उल्लेख केला होता. मात्र, राहुल गांधींनी केलेल्या चौकीदार या शब्दालाच ढाल बनवून भाजपाकडून ‘मै भी चौकीदार’ ही टॅगलाईन घेवून लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार यंत्रणा राबविली जात आहे. त्यामुळे पंतप्रधान, भाजपा अध्यक्ष, केंद्रीय मंत्र्यांकडून ‘चौकीदार’असा उल्लेख करून घेतला जात आहे. त्यांचाच कित्ता जिल्ह्यातील भाजपा आमदार, खासदार, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी देखील अवलंबलेला दिसून येत आहे.
चार आमदारांनी नाही केला बदल
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार ए.टी.पाटील, रक्षा खडसे, स्मिता वाघ, उन्मेष पाटील यांनी आपल्या व्टिटर पेजवर आपल्या नावाच्या पुढे ‘चौकीदार’ असा उल्लेख केला आहे.
मात्र, फेसबूक पेजवर कोणत्याही आमदाराने आपल्या नावापुढे बदल केलेला दिसून येत नाही. भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी देखील व्टिटरवर आपल्या नावापुढे ‘चौकीदार‘ उल्लेख केला आहे. मात्र, आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, हरिभाऊ जावळे व चंदूलाल पटेल यांनी आपल्या फेसबूक व व्टिटरवरील नावात कोणताही बदल केलेला नाही.
हरिभाऊ जावळे हे केवळ फेसबूक वापरतात व्टिटरवर त्यांचे अधिकृत अकांऊट नाही. भाजपाच्या अनेक नगरसेवकांनी फेसबूक व व्टिटरवर आपल्या नावापुढे ‘चौकीदार’ शब्दाचा उल्लेख केलेला दिसून येत आहे.
या तुलनेत कार्यकर्ते मात्र आघाडीवर असल्याचे दिसून येत आहेत. तर विरोधकांकडूनही त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न सोशल मिडियावर सुरू असल्याचे दिसून येत आहे.
नंदुरबारमध्ये खासदार व दोन्ही आमदार दूरच
नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भाजपाच्या पदाधिकाºयांनीही सोशल मिडीयावर ‘मै भी चौकीदार’च्या पोस्ट व्हायरल केल्या आहेत. भाजपाच्या अनेक पदाधिकाºयांनी व सामान्य कार्यकर्त्यांनी एक विशिष्ट पोस्ट तयार करून त्या व्हायरल करण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यात भाजपाचे नंदुरबार तालुकाध्यक्ष रघुनाथ पाटील, नंदुरबार शहराध्यक्ष मोहन खानवाणी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा त्यात समावेश आहे. जिल्ह्यातील भाजपाच्या विद्यमान खासदार डॉ.हीना गावीत व आमदार उदेसिंग पाडवी , आमदार डॉ.विजयकुमार गावीत हे दोन्ही आमदार मात्र त्यापासून लांब आहेत. दोघा आमदारांचे सोशल मिडिया अकाऊंटच नसल्याचे समजते.