आठ वर्षे कुठे होतात? तेव्हा गाव दिसलं नाही? ग्रामस्थांचा संताप, रक्षा खडसेंनी घेतला काढता पाय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 09:04 PM2022-05-06T21:04:00+5:302022-05-06T21:07:50+5:30
खासदार रक्षा खडसे यांच्या बैठकीत दोन गावांमध्ये उडाला गोंधळ; ग्रामस्थांनी विचारला जाब
जळगाव: रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे ह्या बिडगाव व वरगव्हाण येथे बैठकीसाठी आल्या होत्या. त्यावेळी आठ वर्षांत आमचे गाव कधी दिसले नाही का? आठ वर्ष कुठे होता, असा ग्रामस्थांकडून प्रश्नांचा भडीमार झाल्याने एकच गोंधळ उडाला. शेवटी खासदार खडसे यांना गावातून निघून जावे लागले. शुक्रवारी सकाळी बिडगाव व वरगव्हाण या दोन गावात हा प्रकार घडला. मात्र असा प्रकार झाला नसल्याचे खासदार खडसे यांनी म्हटले आहे.
खासदार रक्षा खडसे यांचा चोपडा तालुक्यात पाच दिवसांचा दौरा गुरुवारपासून सुरु झाला. शुक्रवारी सकाळी १० वाजता त्या बिडगाव येथे पोहोचल्या. खासदार येणार असल्याने ग्रामपंचायत आवारात मोठी गर्दी जमली होती. बैठक सुरु होताच काही ग्रामस्थांनी खासदारांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. आपण गेल्या आठ वर्षांपासून आमच्या गावात एकदाही आल्या नाहीत. तेव्हा कुठे होतात? आपणास आमचे गाव कधी दिसले नाही का? अनेक वेळा फोन करूनही समस्या सोडवणे, तर दूरच पण प्रतिसादही मिळत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगताच गोंधळास सुरुवात झाली. बिडगावप्रमाणेच वरगव्हाण येथेही हेच चित्र पहायला मिळाले. सुरक्षा रक्षकांनी ग्रामस्थांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण तरीही गोंधळ वाढतच होता.
प्रत्येक गावात जाणे कठीण- खडसे
मतदार संघात १४०० गावे आहेत. प्रत्येक गावात जाणे कठीण जाते. मात्र त्यामुळे कामे होत नाहीत, असे नाही समस्या सोडविण्यासाठी आपण आलो आहोत. शांततेत प्रश्न मांडा, असे आवाहन खासदार खडसे यांनी केले. तरीही गोंधळ सुरुच राहिला. त्यामुळे खासदारांनी बिडगाव येथून निघून जाणे पसंत केले.
चोपडा तालुक्यात आज दुसऱ्या दिवशी चांगले आणि व्यवस्थित दौरे झाले आहेत. कुठेच गोंधळ झालेला नाही.
- खासदार रक्षा खडसे.