भाजपचे गटनेते पदही जाण्याच्या तयारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:12 AM2021-05-31T04:12:41+5:302021-05-31T04:12:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दोन महिन्यांपूर्वी महापालिकेत ५७ जागा असलेल्या भाजपकडे सद्य:स्थितीत केवळ २७ नगरसेवक शिल्लक असून, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दोन महिन्यांपूर्वी महापालिकेत ५७ जागा असलेल्या भाजपकडे सद्य:स्थितीत केवळ २७ नगरसेवक शिल्लक असून, महापौर व उपमहापौर पद गमावल्यानंतर आता भाजपचे गटनेते पददेखील जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मनपातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या ३० बंडखोर नगरसेवकांनी महापौर व मनपा आयुक्तांकडे हे पद बंडखोर नगरसेवक यांच्या गटाला मिळावे यासाठी लवकरच पत्र देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महापालिकेत भाजपची सत्ता असताना भाजपकडे ५७ नगरसेवकांची फौज होती. मात्र आता भाजपचे ३० नगरसेवक पक्षाच्या विरोधात जाऊन शिवसेनेला मिळाले आहेत. मात्र, त्यांनी भाजपचा राजीनामा न दिल्यामुळे सद्य:स्थितीत हे नगरसेवक भाजपचेच गृहीत धरले जात आहेत. त्यात आता भाजपकडे केवळ २७ नगरसेवक शिल्लक आहेत, तर बंडखोरांकडे ३० नगरसेवक आहेत. अशा परिस्थितीत गटनेतेपद २७ नगरसेवकांकडे न देता हे पद बंडखोर नगरसेवकांकडे यावे यासाठी आता तयारी सुरू केली आहे. एकीकडे शिवसेनेचे ऑपरेशन शिवधनुष्य सुरू असताना दुसरीकडे महापालिकेतील भाजपकडे उर्वरित नगरसेवकांचे खच्चीकरण करून मनपातील त्यांची ताकद कमी करण्यासाठी नगरसेवकांनी चंग बांधला आहे.
भाजपचे छाटले पंख
शिवसेनेने भाजपकडून महापालिकेतील सत्ता तर घेतलीच आहे. मात्र, त्यासोबतच भाजपला महापालिकेतील पदांवर देखील पाणी फेरावे लागत आहे. भाजपला महापालिकेत कोणतेही महत्त्वाचे पद मिळू नये यासाठी शिवसेना बंडखोर नगरसेवकांकडून प्रयत्न केले जात आहेत. मनपाविरोधी पक्षनेते पददेखील अजूनही शिवसेनेकडे आहे. तर आता गटनेते पददेखील घेऊन शिवसेनेने भाजपचे मनपातील पंख छाटण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच मनपा स्थायी समिती सभापती पद येत्या काही महिन्यांमध्ये शिवसेना व बंडखोर नगरसेवक हे आपल्याकडे खेचण्याच्या तयारीत आहेत.