Raksha Khadse: “घोषणा आणि भाषणांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत”; रक्षा खडसेंची ठाकरे सरकारवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 04:25 PM2021-11-04T16:25:29+5:302021-11-04T16:27:09+5:30
Raksha Khadse: एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
जळगाव:महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि भाजपसह अन्य विरोधकांमध्ये अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे. राज्यात जवळपास सर्वच भागात चक्रीवादळ, अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. केवळ घोषणा करून आणि भाषणे देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत, अशी बोचरी टीका रक्षा खडसे यांनी केली आहे.
ठाकरे सरकारकडून दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांना आणि जनतेला खूप मोठी अपेक्षा होती. खूप कमी मदत शेतकऱ्यांना देण्यात आली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मला फोन येत आहेत. सरकारनं शेतकऱ्यांकडे पूर्ण दूर्लक्ष केले आहे. सरकारला याबाबत पत्र लिहिणार आहे. शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे, असे रक्षा खडसे यांनी म्हटले आहे.
उद्धवा… अजब तुझे सरकार
यापूर्वी, ‘उद्धवा… अजब तुझे सरकार’ असे म्हणत विनायक मेटे यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. आर्यन खाननंतर वेळ मिळाला असेल तर ठाकरे सरकारने आता शेतकऱ्यांकडे पाहावे, असा टोला मेटेंनी लगावला. गेल्या १० महिन्यात १५९ आत्महत्या झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनासाठी आणि सरकारसाठी ही बाब लाजिरवाणी आहे. प्रशासनाने किती आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन चौकशी केली, अशी विचारणा करत मेटे यांनी दिवाळीनंतर शिवसंग्राम रस्त्यावर उतरणार असून हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा दिला आहे.
दरम्यान, कोरोना नियम शिथिल होताच राज्यभरात वेगवेगळ्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. सहकारी संस्था, जिल्हा बँका, पोटनिवडणुका अशा अनेक प्रकारच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला जबर धक्का बसला. भाजप खासदार रक्षा खडसे, विधानपरिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले. धरणगाव विकास सोसायटी मतदारसंघानंतर अमळनेर विकास सोसायटी, बोदवड आणि मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघात उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहेत.