भाजप-सेनेत बदलली नेतृत्वाची कूस; युती झाली भक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 06:00 AM2019-07-09T06:00:02+5:302019-07-09T06:00:18+5:30

जळगाव जिल्ह्यातील चित्र; गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्या मैत्रीचे रंग खुलणार

BJP-Senate leadership change; Alliance was strong | भाजप-सेनेत बदलली नेतृत्वाची कूस; युती झाली भक्कम

भाजप-सेनेत बदलली नेतृत्वाची कूस; युती झाली भक्कम

चुडामण बोरसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भाजप-शिवसेना युतीचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यात नेतृत्वाची कूस बदलली आहे. भाजपमध्ये एकनाथ खडसे यांच्याऐवजी गिरीश महाजन तर शिवसेनेमध्ये सुरेशदादा जैन यांच्याऐवजी गुलाबराव पाटील यांच्याकडे नेतृत्वाची धुरा आली आहे. लोकसभा निवडणुकीत ‘युती’ भक्कम राहिल्याने विधानसभेत तोच कित्ता गिरविला जाण्याची शक्यता आहे. जळगावसह एक-दोन जागांवर कुरबुरी वाढल्या तरी पक्षश्रेष्ठी मार्ग काढतील, असा कार्यकर्त्यांना विश्वास आहे.


जळगाव जिल्ह्यात ११ विधानसभा मतदार संघ आहेत. त्यात जळगाव शहर, अमळनेर, भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर आणि चाळीसगाव हे मतदार संघ भाजपकडे तर जळगाव ग्रामीण, पाचोरा आणि चोपडा हे तीन मतदार संघ शिवसेनेकडे तर अमळनेर अपक्ष आणि राष्टÑवादी काँग्रेसकडे एकमेव एरंडोल मतदार संघ आहे.
विधानसभेसाठी अनेक इच्छुक आहेत. युती होईल की नाही, याबाबत अनेक तर्क लढविले जात आहेत. युती झाली तरी अडचणी आहेत. युतीतच जास्त बंडखोरीची शक्यता आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप व सेना स्वतंत्र लढले होते. त्यामुळे सन २००९ मध्ये ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते. त्याठिकाणी सन २०१४ मध्ये भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे भाजप हे मतदार संघ आता युती झाल्यास सहजासहजी सोडेल, अशी शक्यता कमीच आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर जळगाव आणि भुसावळ मतदार संघाचे घेता येईल. गेल्या काही दिवसांपूर्वीच आपण विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन यांनी जाहीर करुन खळबळ माजविली आहे. पूर्वीच्या जळगाव मतदार संघातून सुरेशदादा जैन हे नऊ वेळा निवडून आले आहेत. गेल्या वेळी त्यांचा पराभव झाला होता. पण त्यावेळी ते शहरात नसल्याने प्रचारात सहभागी होऊ शकले नव्हते. यावेळी ते स्वत: शहरात आहेत.


पालकमंत्री गिरीश महाजन हे सांगतील त्यालाच विधानसभेचे तिकिट मिळेल आणि त्याला निवडून आणण्याची जबाबदारी ते घेतील, हे निश्नित. जामनेरात तर अनेक प्रतिस्पर्धी त्यांनी भाजपात आणले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या मतदारसंघात विरोध असा राहिलेला नाही.
मुक्ताईनगर मतदार संघातून एकनाथ खडसे यांनाही कुणी आव्हान देईल, अशी स्थिती नाही. मागील निवडणुकीत शिवसेना उमेदवाराने त्यांना जोरदार टक्कर दिली होती. पण मध्यंतरीच्या काळात विरोधक ढेपाळले आहेत. त्यामुळे त्याचा फायदा खडसे यांना सहज होईल, अशी स्थिती आहे.
जिल्ह्यात काँग्रेस-राष्टÑवादीची अवस्था बिकट आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला जिल्ह्यात भोपळाही फोडता आला नाही. तर २००९ च्या निवडणुकीत ५ आमदार निवडून आलेल्या राष्टÑवादीला २०१४ मध्ये जेमतेम एक जागा मिळाली. राष्टÑवादी काँग्रेसचे डॉ. सतीश पाटील हे अतिशय कमी मतांच्या फरकाने निवडून आले होते. त्यामुळे आहे ती जागा टिकविण्याचे आव्हान या पक्षासमोर आहे.
वंचित बहुजन आघाडीही आक्रमकपणे पुढे येत आहे. आघाडीचे पॉकेट्स असलेल्या भुसावळ व रावेरमधून त्यांनी तयारी सुरू केली आहे. वंचित काँग्रेस आघाडीसोबत गेल्यास त्यांना कुठली जागा सोडायची हा ही एक प्रश्नच राहील.


चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील खासदार झाल्याने ही जागा रिक्त आहे. त्यामुळे युतीच्यावतीने येथे सर्वात जास्त इच्छुक आहेत. त्यामुळे पर्यायाने बंडखोरीची भीती इथेच जास्त आहे. यातून भाजपला दगाफटका होण्याची शक्यताही आहे. त्यामुळे इच्छुकांना सांभाळताना युतीला मोठीच कसरत करावी लागणार आहे.

भाजप, राष्ट्रवादीला जिल्हाध्यक्षच नाही
सध्याच्या स्थितीत भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. तर राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी अजूनही कुणाचीही नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांना सध्या तरी जिल्हाध्यक्ष नाहीत.

Web Title: BJP-Senate leadership change; Alliance was strong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.