भाजपा-शिवसेनेची मनपा निवडणुकीत नुरा कुस्ती - डॉ.अर्जुन भंगाळे यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 01:12 PM2018-07-25T13:12:05+5:302018-07-25T13:12:57+5:30
सात ते आठ जागी काँग्रेसला मिळेल यश
जळगाव : मनपा निवडणुकीत समविचारी पक्षांना सोबत घेऊन आम्ही आघाडी करण्याचा प्रयत्न केला. काही प्रभागात आघाडी झाली मात्र काही ठिकाणी एकमत न झाल्याने मैत्रीपूर्ण लढत होत आहे. तर शिवसेना व भाजपा या दोन्ही पक्षांनी सहमतीने जागा वाटप केले असून दोन्ही पक्षांची नुरा कुस्ती असल्याचा दावा काँग्रेसचे महानगराध्यक्ष डॉ.अर्जुन भंगाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची भूमिका ‘लोकमत’ने जाणून घेतली असता ते बोलत होते. काँग्रेसची भूमिका त्यांच्याच शब्दात.
प्रश्न : काँग्रेसने नेमक्या किती प्रभागांमध्ये आघाडी केली आहे?
डॉ.भंगाळे : मतांचे विभाजन टाळले जावे यासाठी आम्ही राष्ट्रवादी व समाजवादी पक्षासोबत आघाडी केली. मात्र सद्यस्थितीला प्रभाग ७, ११ व १९ यामध्ये आघाडी झालेली आहे. तर प्रभाग ५, ६, ८, ९, १०, १५, १६ मध्ये आमच्यात मैत्रीपूर्ण लढत आहे.
प्रश्न : काँग्रेसच्या प्रचाराचे मुद्दे कोणते?
डॉ.भंगाळे : जळगावकरांनी अनेक वर्षांपासून खाविआला सत्ता दिली आहे. मात्र आजही रस्ते, गटारी, आरोग्य हे प्रश्न प्रलंबित आहेत. मुलभूत सुविधा पुरविणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. या मुद्यांवर आमचा फोकस असणार आहे.
प्रश्न : आमदार अब्दुल सत्तार यांच्या आवाहनानंतरही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी का दिली नाही?
डॉ.भंगाळे : आमच्या कुटुंबात सद्यस्थितीला केवळ मी आणि पत्नी आहे. मी दोन वेळा आमदार व एक वेळा खासदारकीची निवडणूक लढविली आहे.
त्यामुळे नगरसेवकपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक नाही. पत्नीला राजकारणात रस नसल्याने त्यांनी निवडणुकीस उभे राहण्यास नकार दिला.
प्रश्न : तुमच्या कुटुंबातील सदस्य सर्वच पक्षात असल्याच्या आरोपाबाबत काय?
डॉ.भंगाळे : माजी महापौर विष्णु भंगाळे हे केवळ शिवसेनेत आहेत. त्याव्यतिरिक्त राजकारणात कुणी नाही. आमदार सुरेश भोळे हे जवळचे नातेवाईक आहेत. मात्र कुणी कोणत्या पक्षात रहावे हा प्रत्येकाच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. मी काँग्रेसी विचारांचा आहे. माझे विचार मी त्यांच्यावर कसे लादणार.
प्रश्न : निरीक्षकांचे जळगावकडे दुर्लक्ष होत आहे का?
डॉ.भंगाळे : जळगावची जबाबदारी असलेले माजी मंत्री अब्दुल सत्तार, काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक विनायकराव देशमुख, सहनिरीक्षक डॉ.हेमलता पाटील हे सतत आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे असे म्हणता येणार नाही. सध्या उमेदवार प्रभागांमध्ये प्रचारफेºया काढून मतदारांशी संपर्क साधत आहेत. आगामी २६ ते २८ जुलै दरम्यान आम्ही मालेगावचे आमदार आसिफ शेख व माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रचार सभा घेण्याचे नियोजन आहे.
धक्कादायक निकाल लागणार
या निवडणुकीत सर्वच प्रभागामध्ये चौरंगी लढत आहे. त्यामुळे निकाल हा धक्कादायक राहणार आहे. यावेळी भाजपा २५ ते ३०, शिवसेना २५ ते ३०, काँग्रेस ७ ते ८ व उर्वरित जागा या राष्ट्रवादी व समाजवादी पार्टीला मिळतील असा माझा वैयक्तिक अंदाज आहे.
या प्रभागांमध्ये काँग्रेसला मिळेल यश
या निवडणुकीत प्रभाग ६, ७, ८, १०, १५ व १६ या ठिकाणी आमचे उमेदवार विजयी होतील अशी अपेक्षा आहे. सर्वच प्रभागांमध्ये चौरंगी लढत असल्याने प्रस्थापितांना यावेळी धोका आहे.