महाविकास आघाडीचे सरकार पडण्याचे स्वप्न पाहण्यापेक्षा भाजपने आपले आमदार सांभाळावे - गुलाबराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 12:52 PM2020-08-16T12:52:36+5:302020-08-16T12:52:36+5:30
'मुंगेरीलाल के हसीन सपने' न पाहण्याचा सल्ला जळगाव : महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार, अशी अफवा गेल्या काही दिवसांपासून विरोधीपक्ष ...
'मुंगेरीलाल के हसीन सपने' न पाहण्याचा सल्ला
जळगाव : महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार, अशी अफवा गेल्या काही दिवसांपासून विरोधीपक्ष भाजपकडून पसरविली जात आहे. त्यात कोणतेही तथ्य नाही. आमचे सरकार स्थापन झाले, तेव्हापासून भाजपकडून सरकार पडणार असा दावा केला जात आहे. पण त्याला काही एक अर्थ नाही. महाविकास आघाडीचे सरकार पडणार म्हणजे हे भाजपचे 'मुंगेरीलाल के हसीन सपने' आहेत. आपले आमदार टिकविण्यासाठी भाजपकडून हा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. आमचे सरकार कोसळणार नाहीच, उलट भाजपने त्यांचे आमदार सांभाळावेत. नाही तर ते आमच्याकडे येतील, अशा शब्दांत शिवसेनेचे उपनेते तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर टीला केली.
स्वातंत्र्य दिनानिमित्तचा जिल्हास्तरीय ध्वजारोहण कार्यक्रम आटोपल्यानंतर अजिंठा विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटील यांनी सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरण, भाजपकडून महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याची सुरू असलेली चर्चा, राज्य सरकारकडून होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या अशा विविध विषयांवर आपले मते मत व्यक्त केले.
भाजपच्या सरकार कोसळणार असल्याच्या टीकेचा जोरदार समाचार घेतला. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार पडणार, असा दावा भाजपकडून कितीही सुरू असला तरी त्याला काहीही अर्थ नाही. सरकार स्थापन झाल्यापासून भाजपचा हा दावा सुरू आहे. राजस्थानचे सरकार पडणार अशी चर्चा होती. राजस्थानचे सरकार आम्ही पाडू, असा भाजपचा दावा होता. मात्र, आपण पाहिले की राजस्थानच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. राजस्थानचे बहुमत पाहिले तर ते अवघे १० ते २० मतांचे होते. आपल्याकडे १७० आमदार एकत्र आहेत. म्हणजेच सरकार पडणार हे भाजपचे 'मुंगेरीलाल के हसीन सपने' आहेत. आपले आमदार टिकविण्यासाठी भाजपकडून हा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. आमदार फुटू नयेत म्हणून भाजपकडून केविलवाणा प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडीचे सरकार पडेल, मग आपले सरकार येईल. आपले मंत्री होऊन आपली कामे होतील, अशा प्रकारची लालसा भाजप आपल्या आमदारांना दाखवत आहे. पण आमचे सरकार पाच वर्षे सुरळीतपणे चालणार आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
..... तर सहा वर्षातील बदल्यांची चौकशी झाली पाहिजे
राज्य सरकारकडून अधिकाऱ्यांच्या बदली प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याच्या भाजपच्या आरोपांवर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, अधिकाऱ्यांच्या बदल्या ही नियमित प्रक्रिया आहे. त्यात गैर काहीही नाही. मागे पाच वर्षे त्यांचेही सरकार होते. त्यावेळी आम्ही त्यांच्या सोबत होतो. तेव्हाही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. तेव्हा तर एकाच महिन्यात दोन-दोन, तीन-तीन बदल्या झालेल्या मी पाहिल्या आहेत. जर बदल्यांची चौकशी करायची असेल तर मग गेल्या ६ वर्षांत झालेल्या बदल्यांची व्हायला हवी. त्यात किती गैरप्रकार झाले आहेत, ते लक्षात येईल ना? मात्र, चंद्रकांत पाटील हे माझ्यापेक्षा ज्येष्ठ मंत्री होते. त्यांनी केलेला हा आरोप म्हणजे सरकारला तसेच मंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची टीका गुलाबराव पाटील यांनी केली.
पार्थ पवार यांच्या विषयावरून नाहक राजकारण
पार्थ पवारांच्या विषयावर गुलाबराव पाटील म्हणाले, पार्थ पवार यांच्या विषयावरून नाहक राजकारण सुरू आहे. शेवटी शरद पवार हे सर्वेसर्वा आहेत. शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात राजकारणाच्या पलीकडे नाते आहेत. आजोबा म्हणून त्यांचा कान पकडण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यामुळे या विषयावर होणारी टीका चुकीची आहे. इकडे आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत देखील त्यांना हे पद दिले म्हणून टीका सुरू आहे. आता देवेंद्र फडणवीस यांना भाजपने बिहारची जबाबदारी दिली म्हणून आम्ही काय त्यांना 'ही' जबाबदारी दिली म्हणतोय का? ज्या व्यक्तीमध्ये जी क्षमता असते, त्यानुसार पक्ष जबाबदारी देत असतो. मात्र, आदित्य ठाकरे हे ठाकरे असल्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.