गुलाबराव पाटलांच्या घरासमोर 'भाजयुमो'नं काढली निषेधाची रांगोळी; विद्यापीठ सुधारणा कायद्याचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 11:15 AM2022-01-18T11:15:43+5:302022-01-18T11:16:05+5:30
महाविकास आघाडी सरकारने आणलेल्या विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाविरोधात भारतीय जनता पक्षाकडून तीव्र विरोध होत असून, सोमवारी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास थेट पालकमंत्र्यांच्या घरासमोरच आता भारतीय जनता युवा मोर्चाच्या सदस्यांनी गनिमी कावा पद्धतीने आंदोलन केले.
जळगाव- महाविकास आघाडी सरकारने पारित केलेल्या विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाला भारतीय जनता युवा मोर्चानं तीव्र विरोध केला आहे. या विधेयकाचा आणि महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्री 1 वाजता चक्क पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी येथील निवासस्थानासमोर निषेधाची रांगोळी काढली. तसेच पालकमंत्र्यांच्या संपर्क कार्यालयासमोर देखील रांगोळी काढत विद्यापीठ कायद्यांविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
महाविकास आघाडी सरकारने आणलेल्या विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाविरोधात भारतीय जनता पक्षाकडून तीव्र विरोध होत असून, सोमवारी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास थेट पालकमंत्र्यांच्या घरासमोरच आता भारतीय जनता युवा मोर्चाच्या सदस्यांनी गनिमी कावा पद्धतीने आंदोलन केले. युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले असून, या आंदोलनात भारतीय जनता मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, प्रदेश सचिव भैरवी वाघ-पलांडे, भाऊसाहेब पाटील, सचिन पवार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. रात्री १२.३० वाजता पाळधी येथील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठ कायद्याच्या विरोधातील पेंटिंग काढली. तसेच संपर्क कार्यालयासमोर विद्यापीठ कायद्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. त्यानंतर पालकमंत्र्यांचा निवासस्थानासमोर जाऊन त्या ठिकाणी देखील काळी रांगोळी काढण्यात आली.
भाजयुमो विरूद्ध युवासेनेचा वाद पेटणार?
विद्यापीठ कायद्यावरून सध्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष व भारतीय जनता पार्टी यांच्यात चांगलेच आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात आता भारतीय जनता युवा मोर्चाने थेट पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या गावात जाऊन यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करत शिवसेना व युवासेनेला एक प्रकारे आव्हानच दिले आहे. या आंदोलनानंतर भारतीय जनता पार्टी व शिवसेना यांच्यात नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर देखील शिवसैनिकांनी भाजप कार्यालयावर जाऊन कोंबड्या फेकून आंदोलन केले होते. त्याला उत्तर देत भाजपने देखील शहरात आंदोलन केले होते. आता या आंदोलनानंतर पुन्हा भाजप विरुद्ध सेना वाद तापण्याची शक्यता आहे.