बावनकुळे मास्तरांच्या शाळेत ‘त..त..फ...फ..! ‘लावरे फोन त्याला’मुळे फजिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 07:15 PM2023-04-11T19:15:03+5:302023-04-11T19:15:23+5:30

भाजपच्या बुथ सशक्तीकरण अभियानाचा घेतला आढावा

BJP state president Chandrasekhar Bawankule reviewed the booth office bearers of the party | बावनकुळे मास्तरांच्या शाळेत ‘त..त..फ...फ..! ‘लावरे फोन त्याला’मुळे फजिती

बावनकुळे मास्तरांच्या शाळेत ‘त..त..फ...फ..! ‘लावरे फोन त्याला’मुळे फजिती

googlenewsNext

कुंदन पाटील

जळगाव - बुथ सशक्तीकरण अभियानाचा आढावा घेणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या शाळेत जळगावकर पदाधिकारी ‘सपास’ ठरले. बुथकेंद्रनिहाय आढाव्याच्या परिक्षेला गेलेल्या असंख्य पदाधिकाऱ्यांची ‘त...त...फ...फ’ पाहून बावनकुळेंनी ‘लाव रे फोन त्याला’ची मोहिम हाती घेतल्याने अनेकांना घाम फुटला. बावनकुळेंनी भरविलेल्या शाळेत बडबडत्या पदाधिकाऱ्यांचे बोल ऐकून ‘आता मकरंद अनासपुरेंना जिल्हाध्यक्ष करायचं काय’ असा सवालच त्यांनी करुन डोक्याला हात मारुन घेतला.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी जळगाव दौऱ्यावर होते.दुपारी छत्रपती संभाजी नाट्यगृहात जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी बुथ सशक्तीकरण अभियानाचा घेतला. त्यावेळी प्रत्येक शक्ती व बुथ प्रमुखाला त्यांनी व्यासपीठावर बोलावून आढावा ऐकून घेतला. चोपड्याच्या पदाधिकाऱ्यांनी आदिवासी तालुका आहे, अशी पळवाट काढली. तेव्हा आदिवासींकडे महागडे मोबाईल नाही, असे सांगून पळवाट काढून नका म्हणून त्यांनी सुनावले.भाजप कार्यालयात हा डेटा एन्ट्री करा, अशा सूचना केल्या. तेव्हा तालुकाप्रमुखांनी संगणकासह यंत्रणा उपलब्ध करुन द्या म्हणून मागणी केली. तेव्हा बावनकुळेमास्तरही स्तब्ध झाले आणि हळूच म्हटले...म्हणूनच मी आलो आहे...असे सांगत त्यांनी शांतच राहणं पसंत केलं. तेव्हा या तालुकाप्रमुखाने मकरंद अनासपुरेंमुळे खूप शिकायला मिळालं. डाटाची माहिती जमा करणं त्यांनी शिकवलं. तेव्हा बावनकुळेच म्हटले... आता अनासपुरेंनाच जिल्हाध्यक्ष करायचं का?....त्यांचा हा सवाल ऐकून सभागृह चांगलाच खदखदला.

अमळनेरच्या प्रमुखाला ‘किती बुथ प्रमुख आलेत’, असा प्रश्न केला. तेव्हा पाचपैकी एकही आला नाही, असे उत्तर मिळताच बावनकुळे चिडले. त्यांना बैठकीचा ‘निरोप’ दिला होता का, असा सवा बावनकुळेंनी केला. होकार मिळताच बावनकुळेंनी पाचही जणांना फोन लावा म्हणून सूचना केल्या आणि त्यानंतर ते पाचही जणांशी बोलले. एकाला निरोपच नव्हता, हे कळल्यावर ‘थापा’ मारता काय, म्हणत त्यांनी संताप केला. प्रत्येक तालुका आणि शहराचा आढावा घेताना हा प्रवास पाहून बावनकुळेंनी लक्ष द्यायची गरज आहे म्हणून जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांना सांगितले.

या रे तुम्ही सहाही जण व्यासपीठावर...
अमळनेरच्या प्रमुखाने ४० शक्ती व बुथ प्रमुख नेमल्याचे छाती फुगवून सांगितले. तेव्हा बावनकुळेंनी तोच धागा पकडला आणि आता इथं किती आलेत, असा सवाल केला. तेव्हा एकही आला नाही, हे ऐकताच बावनकुळे अवाक्‌ झाले. बाजार समितीच्या निवडणुकीत व्यस्त असल्याची पळवाट शोधल्यावर ‘सर्वच निवडणुका लढवताय का’ असा सवाल बावनुकळेंनी केला. तेव्हा उत्तर देताना प्रमुखाची ‘त...त...फ...फ..’ उडाली. तेव्हा बैठकीला उपस्थित अन्य सहाही पदाधिकाऱ्यांना व्यासपीठावर बोलावले. हा प्रसंग पाहून एकाने तर डोकंच खाजवयाला सुरुवात केली. या सहाही जणांवर प्रश्नांची सरबत्ती झाल्यावर तेही गोंधळून गेले. बावनकुळेंची ‘लाव रे फोन त्याला’ ही मोहिम सुरुच ठेवल्याने या सहाही पदाधिकाऱ्यांना वेळ मारायची संधी मिळालीच नाही.

जळगावचा नगसेवकही गोत्यात
भाजपने वर्षभरासाठी हाती घेतलेल्या सहा कार्यक्रमांविषयी बावनकुळे यांनी जळगावच्या एका नगरसेवकाला विचारणा केली. या अर्ध्या डझनी कार्यक्रमाविषयी अनभिज्ञ असलेल्या नगरसेवकाची कोंडी पाहून बावनकुळे यांनी अन्य नगसेवकाला माहिती विचारली.त्याने सहाही कार्यक्रम व्यवस्थितपणे मांडल्यावर बावनकुळेंचे समाधान झाले.

काम कमी चालेल पण...
काम कमी असलं तरी चालेल पण खोटं बालू नका. खोटा अहवाल देऊ नको. आम्ही प्रत्येक अहवालाची पडताळणी करतोच. कारण आपल्याला भविष्यात तीन पक्षाची लढायचे आहे. त्यामुळे प्रत्येक बुथवरुन ५१ टक्के मतदान घ्यायचे आहे, हे आपले स्वप्न आहे. त्यामुळे प्रत्येकाने आता मनापासून पक्षसेवा करावी, असे आवाहन बावनकुळेंनी केले.

आमदार-खासदारांमध्ये ‘खसखस’
बावनकुळेंनी आढावा घेताना अतिशय खालच्या वर्गाला हात घातला. त्यामुळे ‘कागदी’ पदाधिकाऱ्यांची ‘रद्दी’च झाली. बावनकुळे फोन लावत उलटतपासणी करत गेले तेव्हा पदाधिकाऱ्यांचा उडणारा गोंधळ पाहून उपस्थित आमदार, खासदारांमध्ये खसखसच पिकत होती. जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, मंगेश चव्हाण, खासदार वर्षा खडसे, उन्मेश पाटील, नंदुरबारचे विजय चौधरी, स्मिता वाघ, डॉ.राजेंद्र फडके यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Web Title: BJP state president Chandrasekhar Bawankule reviewed the booth office bearers of the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.