जळगावात भाजपा प्रदेश प्रवक्त्यांकडून स्थानिक प्रश्नांना बगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 12:29 PM2018-12-30T12:29:12+5:302018-12-30T12:29:39+5:30
के शव उपाध्ये यांनी केली केवळ राफेलवरच चर्चा
जळगाव : भाजपाचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शनिवारी येथे घेतलेल्या पत्रपरिषदेत केवळ राफेल विषय मांडत राहूल गांधी यांच्यावर टिका केली. मात्र स्थानिक प्रश्नांवर उत्तरे देण्याचे टाळून राफेलवरच पक्षाची बाजू मांडली.
भाजपा कार्यालयात ही पत्र परिषद शनिवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान झाली. यावेळी आमदार सुरेश भोळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, अस्मिता पाटील, तारा पाटील, सुभाष शौचे, नगरसेवक विशाल त्रिपाठी, सुनील माळी, मनोज भांडारकर आदी उपस्थित होते.
यावेळी उपाध्ये म्हणाले की, केंद्रातील भाजपा सरकारने गेल्या साडेचार वर्षात पारदर्शक कारभार केला आहे. कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप भाजपावर नसल्याने कॉँग्रेसकडून कोणत्याही मुद्यावर केंद्राला घेरता येत नसल्यानेच राफेल कराराबाबत केंद्र सरकारवर बिनबुडाचे आरोप लावले जात आहेत. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला क्लिन चिट दिली असल्याने राहुल गांधींनी आता देशाची माफी मागितली पहिजे अशी मागणी त्यांनी केली.
केशव उपाध्ये यांनी सांगितले की, राफेल करारासंदर्भात नियम व अटी काँग्रेस सरकारच्या काळात ठरल्या होत्या.२००८ ते २०१४ पर्यंत काँग्रेसचे सरकार सत्तेत होते. त्यावेळी भारतीय संरक्षण दलाला अत्याधुनिक लढाऊ विमानांची गरज होती. त्यासाठी राफेल विमानांच्या खरेदीचा करार अत्यावश्यक होता. मात्र, असे असताना काँग्रेस सरकारला करार करता आला नाही. भाजपने देशाच्या सुरक्षेचा विचार करून राफेल करार पारदर्शक पद्धतीने केला, असेही ते म्हणाले.
काही तासच थांबले
केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत राफेल ऐवजी इतर कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्याची टाळले. ते शनिवारी दुपारपर्यंत शहरातच होते. त्यांनी काही ठिकाणी भेटी दिल्या आणि दुपारी ते नाशिकसाठी रवाना झाले.