भाजपा उमेदवाराबाबत अनिश्चिता !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:58 PM2019-03-11T12:58:35+5:302019-03-11T12:58:50+5:30
जळगाव लोकसभा मतदार संघ
हितेंद्र काळुंखे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लोकसभा निवडणुकीची रविवारी घोषणा झाली. सत्ताधारी भाजपाकडून जिल्ह्यातील जळगाव मतदारसंघासाठी उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाही. तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसने जळगाव लोकसभा मतदार संघासाठी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची उमेदवारी काही दिवसांपूर्वीच जाहीर केली. त्यांनी प्रचार देखील सुरु केला आहे.
भाजपाचे दोन्ही खासदार वगळले जाण्याची शक्यता
जळगाव लोकसभा मतदारसंघात गेल्या काही वर्षांपासून भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपाचे ए.टी.पाटील हे विद्यमान खासदार आहे. सलग दोन वेळेस ते या मतदारसंघातून निवडून आले आहेत.
असे असतानाही ‘अंतर्गत’कारणामुळे त्यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे.
जळगाव लोकसभा मतदार संघात खासदार ए. टी. पाटील यांच्या जागी बांधकाम व्यावसायिक प्रकाश पाटील या नव्या कोऱ्या उमेदवारासाठी जलसंपदा गिरीश महाजन यांच्या गटाकडून प्रयत्न सुरु आहेत. दुसरीकडे भाजपाचे अध्यक्ष उदय वाघ यांचे देखील प्रयत्न सुरू आहेत. या दोघांपैकी कोणास तिकीट मिळते याबाबत पक्षात उत्सुकता आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी प्रचार सुरु केला असला तरी काँग्रेसने ते आम्हाला विश्वासात घेत नसल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे आगामी राजकारणाची झलक यातून पहायला मिळत आहे.
जळगाव लोकसभा मतदार संघात गेल्या निवडणुकीत १६ लाख५९ हजार ९७८ इतकी मतदार संख्या होती. गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीत भाजपाची आणि सेनेची युती तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसचीही आघाडी नव्हती.
अशी स्थिती असताना विधानसभा संघ निहाय जळगाव शहर भाजपा, जळगाव ग्रामीण शिवसेना, अमळनेर भाजपा समर्थक अपक्ष, एरंडोल राष्ट्रवादी, चाळीसगाव भाजपा, पाचोरा शिवसेना असे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे आता भाजपा कधी उमेदवार जाहीर करतो, याकडे लक्ष लागून आहे.
जळगाव जिल्ह्यात सुरुवातीस १९५२ पासून जळगावचा काही भाग धुळ्याला जोडून एक मतदार संघ तर काही भाग बुलढाण्याला जोडून दुसरा मतदार संघ होता. त्यानंतर १९७७ पासून जळगाव आणि एरंडोल असे दोन लोकसभा मतदार संघ अस्तित्वात आले. या मतदार संघांची पुनर्रचना सन २००९ मध्ये होवून एरंडोलचा जळगाव आणि जळगावचा रावेर लोकसभा मतदार संघ तयार झाला.