जिल्हा बँकेचा अध्यक्ष 'भाजपचाच' होणार, खडसेंच्या विधानाने उडाला गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 09:20 AM2021-12-03T09:20:23+5:302021-12-03T10:39:37+5:30
एकनाथ खडसेंनी 40 वर्षे भाजपात काम केले असून भाजपाकडून मोठ-मोठ्या पदांवर त्यांनी कारकीर्द गाजवली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते ते महसल मंत्रीपदही त्यांनी भूषवले.
जळगाव - शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याणमधील भाजपा नेत्यानं शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी, आपण भाजपात प्रवेश करत असल्याचे अनावधानाने ते बोलून गेले. यावेळी, एकनाथ शिंदेंसह सर्वांनाच हसू आले. आता, माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंच्याबाबतीतही असाच प्रकार घडला आहे. जिल्हा बँक निवडणुकांतील सत्तास्थापनेच्या बैठकीत बोलताना एकनाथ खडसेंनी आपल्या भाजपकडेच अध्यक्षपद राहिल, असे म्हटले. मात्र, काही वेळातंच आपली चूक दुरूस्त केली.
एकनाथ खडसेंनी 40 वर्षे भाजपात काम केले असून भाजपाकडून मोठ-मोठ्या पदांवर त्यांनी कारकीर्द गाजवली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते ते महसल मंत्रीपदही त्यांनी भूषवले. मात्र, घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर, पक्षांतर्ग वादातून त्यांनी भाजपला राम राम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, 40 वर्षे एकाच पक्षात निष्ठेनं काम केल्यानंतर नवीन पक्षात सेटल होण्यास वेळ लागतोच, हेच खडसेंच्या अनावधानाने झालेल्या विधानातून समोर आलं आहे.
जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात सहकार पॅनलची अजिंठा विश्राम गृहात बैठक पार पडली. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. त्यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेतेही हजर होते. यै बैठकीनंतर पत्रकारांनी अध्यक्षपदासंदर्भात एकनाथ खडसेंना प्रश्न विचारला होता. त्यावर, या निवडणुकीवर बहिष्कार घातलेल्या भाजपाला तीन वर्ष अध्यक्षपद दिले जाईल, असे खडसेंनी म्हटले. त्यानंतर, जवळच असलेल्या गुलाबराव पाटील यांनी खडसेंना चूक लक्षात आणून दिली. त्यावेळी, एकनाथ खडसेंनी आपण 40 वर्षे भाजपात होतो, त्यामुळे ही चूक होणं साहजिक असल्यांच म्हणताच पत्रकारांसह सगळेच हसायला लागले.
दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाला तीन वर्षे, शिवसेनेला दोन वर्षे असं अध्यक्षपद दिले जाणार आहे. काँग्रेस पक्षाला दोन वर्षे उपाध्यक्षपद तर सेनेला दोन वर्ष आणि राष्ट्रावादीला एक वर्षे उपाध्यक्षपद दिले जाणार असल्याचं शेवटी खडसेंनी स्पष्ट केलं.