जिल्हा बँक निवडणूक भाजप स्वबळावर लढणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:18 AM2021-09-22T04:18:56+5:302021-09-22T04:18:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा बँक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनलबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील हे प्रयत्नशील असताना, दुसरीकडे भाजपने मात्र ...

BJP will contest district bank elections on its own? | जिल्हा बँक निवडणूक भाजप स्वबळावर लढणार?

जिल्हा बँक निवडणूक भाजप स्वबळावर लढणार?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा बँक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनलबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील हे प्रयत्नशील असताना, दुसरीकडे भाजपने मात्र स्वबळाची तयारी सुरू केली आहे. सर्वपक्षीय पॅनलमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नावाला भाजपमधून विरोध आहे. त्यांचा सहभाग या पॅनलमध्ये झाल्यास भाजपने स्वबळाची तयारी केली असल्याची माहिती भाजपच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यासाठी भाजपने तयारी म्हणून संभाव्य उमेदवारांच्या नावाची प्राथमिक चाचपणी देखील केली आहे.

जिल्हा बँक निवडणुकीसाठी २५ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. या निवडणुकीत सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन ही निवडणूक बिनविरोध करण्याबाबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक गेल्या महिन्यात झाली होती. याबाबत निर्णय घेण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची एक समिती देखील स्थापन करण्यात आली होती. मात्र, महिना होऊनदेखील या समितीची एकही बैठक झालेली नाही. त्यातच भाजपमधून माजी मंत्री एकनाथ खडसे यांना या पॅनलमध्ये घेण्यास विरोध होत आहे. तसेच सर्वपक्षीय नेत्यांचे पॅनल झाल्यास या पॅनलमध्ये पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना संधी मिळणे कठीण होऊन जाईल. त्यामुळेच सर्वपक्षीय पॅनलची चर्चा सुरू ठेवून दुसरीकडे भाजपने स्वबळाचीही तयारी सुरू ठेवली आहे.

काय आहेत कारणे

१. गेल्या वेळेस अध्यक्षपदाबाबत अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला असताना, पाच वर्ष एकाच संचालकाकडे अध्यक्षपद राहिले, याबाबत देण्यात आलेला शब्द पाळण्यात आला नाही.

२. माजी मंत्री एकनाथ खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत गेले आहेत. अशा परिस्थितीत खडसे यांच्यासोबत जाऊन सर्वपक्षीय पॅनल तयार केल्यास पक्षाची जनमाणसांत प्रतिमा खराब होण्याची भीती.

३. गेल्या वेळचा अनुभव पाहता सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत गिरीश महाजन यांनी पहिल्याच बैठकीत अध्यक्ष-उपाध्यक्षपदाबाबत फॉर्म्युला ठरविण्याबाबत दिसले आग्रही.

४. सर्वपक्षीय पॅनल झाल्यास भाजपकडून जिल्हा बँकेत जाण्यासाठी अनेक इच्छुकांची संधी हुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे पदाधिकारी नाराज होण्याची भीती आहे. त्यामुळे पराभव होवो की विजय, निवडणूक मात्र लढवावी याबाबत भाजपचे पदाधिकारी इच्छुक.

भाजपचे संभाव्य पॅनलमधील उमेदवार

विकास सोसायटी मतदारसंघ संभाव्य उमेदवार

जळगाव- आमदार सुरेश भोळे, अमळनेर-शिरीष चौधरी, एरंडोल-विजय महाजन किंवा अनिल महाजन, भडगाव - प्रशांत पवार, चाळीसगाव - मंगेश चव्हाण, जामनेर - गिरीश महाजन, मुक्ताईनगर - अतुल पाटील किंवा नयना कांडेलकर, भुसावळ-संजय सावकारे, यावल - विनोद पाटील किंवा प्रशांत चौधरी, रावेर-नंदकुमार महाजन, पाचोरा-पंडित शिंदे, धरणगाव, पारोळा, बोदवड या मतदारसंघातील उमेदवाराचे नाव अद्याप निश्चित नाही.

इतर मतदारसंघ -

ओबीसी - नारायण चौधरी, इतर सोसायटी मतदारसंघ - खासदार उन्मेश पाटील, एस. टी.- प्रभाकर सोनवणे, एन. टी.- राजेंद्र राठोड, महिला राखीव - स्मिता वाघ किंवा इंदिरा पाटील.

कोट..

सर्वपक्षीय पॅनलच्या समितीच्या बैठकीबाबत अद्याप कोणतीही चर्चा नाही. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना स्वबळाबाबतदेखील सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत याबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. मात्र, कोणताही निर्णय नाही. सर्वपक्षीय पॅनलबाबत चर्चा सुरू आहेत, याबाबत बैठक लवकरच होईल.

-गिरीश महाजन, माजी मंत्री

ग्रामपंचायत असो वा जि. प., पंचायत समितीची निवडणूक किंवा मग जिल्हा बँकेची निवडणूक सर्वच निवडणुका या भाजप स्वबळाचीच लढण्याची तयारी ठेवतात. मग त्या निवडणुकीत विजय मिळो किंवा पराभव दरम्यान, जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय पॅनलबाबत चर्चा सुरू आहेत. यासाठी गठित समितीची बैठकीत याबाबत निर्णय होऊ शकतो.

- सुरेश भोळे, आमदार, भाजप

Web Title: BJP will contest district bank elections on its own?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.