जळगावची जागा भाजपच लढविणार - पालकमंत्री गिरीश महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:33 PM2019-07-13T12:33:29+5:302019-07-13T12:33:55+5:30
शिवसेनेकडूनही केला जातोय दावा
जळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत वरिष्ठ निर्णय घेणार आहे, मात्र ज्या जागांवर भाजपचे आमदार आहेत त्या जागा सोडून इतर जागांबाबत चर्चा होईल, अशी प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पिंप्राळा रथोत्सवादरम्यान माध्यमांशी बोलताना दिली़ त्यामुळे जळगावची जागा भाजपच लढवेल, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत़
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार सुरेशदादा जैन यांनी निवडणूक लढावी अशी आग्रही भूमिका सुनील महाजन यांनी जाहीर केली होती़ त्यावर सुरेशदादा जैन दुजोरा दिला होता़ शिवसेना ही जागा लढविण्यास आग्रही असताना आता गिरीश महाजन यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे या जागेवरून पुन्हा भाजप-सेनेत रस्सीखेच होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत़ भाजप- सेना युती असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव शहर विधानसभेची जागा कोण लढविणार याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील़ मात्र, ज्या जागांवर भाजपचे आमदार स्थित आहेत, त्या जागा सोडूनच बोलणी केली जाईल, अशी प्राथमिक चर्चा झाल्याचे गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले़
मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणार
मराठा समाजाने जागतिक विक्रमाचे असे मोर्चे शांततेत काढले़ मराठा आरक्षण हे थातूर मातूर स्वरूपात दिलेले नसून ते पूर्ण अभ्यासानिशी दिलेले आरक्षण आहे़ उच्च न्यायालयात मंजूरी मिळालेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली नसून पंधरा दिवसांचा अवधी दिला आहे़ त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातही हे आरक्षण टिकेल, असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सत्कार समारंभाप्रसंगी व्यक्त केला़
पाऊस पडून, नदी, धरणे भरून दुष्काळ मिटू दे दे, असे साकडेही त्यांनी विठ्ठलाकडे घातले़ मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल यावेळी गिरीश महाजन, गुलाबराव पाटील व आमदार सुरेश भोळे यांचा उपस्थितांच्या हस्ते सन्मान करण्यात आला़ गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर जायचे की, नाही यावर प्रश्नचिन्ह असल्याने आपण त्या ठिकाणी गेलो होतो़ आंदोलन सुरू होते, जाळपोळ सुरू होती़ त्यावेळी जेव्हा मराठा समाजाला आरक्षण देणार त्याचवेळी आपण पंढरपूरात पाय ठेवू असे मुख्यमंत्री म्हणाले होते़ व आज त्यांनी समाजाला आरक्षण दिले, असे महाजन यांनी यावेळी सांगितले़
मुुख्यमंत्री युतीचाच : गुलाबराव पाटील
मुख्यमंत्री युतीताच होणार असे मत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील अशा चर्चा रंगत असताना आता मुख्यमंत्री हा युतीचाच होईल, मात्र तो कोणत्या पक्षाचा असेल? हे नंतर ठरेल असेही ते म्हणाले.