भाजप पक्ष वाढीत ‘ओबीसीं’चे योगदान विसरुन चालणार नाही - एकनाथराव खडसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 12:36 PM2019-12-08T12:36:25+5:302019-12-08T12:37:07+5:30
अन्याय कायम, कोअर कमेटीतून काढले, बैठकीसाठी साधे बोलावणे नाही
जळगाव : ओबीसी नेतृत्त्वावर अन्याय झाल्याचे मी कधीही म्हटलेले नाही तर पक्षातील वागणुकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये तशी भावना निर्माण झाली व मी ही बाब पक्षाच्या लक्षात आणून दिली आहे, असे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगत पक्ष वाढीसाठी ओबीसी समाजाने परिश्रम घेतले आहे, हे विसरुन चालणार नाही, असेही सांगायला खडसे विसरले नाही न त्यांनी या समाजाच्या योगदानाची आठवण आपली नाराजी व्यक्त करताना जळगावात करून दिली.
भाजपतील पक्षांतर्गत गटबाजीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जळगावात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रस्तरीय कमिटीची बैठक झाली. निर्धारित वेळेपेक्षा तब्बल दोन तास उशिरा ही बैठक सुरू झाली.
बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक, माजी मंत्री गिरीश महाजन, माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, जयकुमार रावल, विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील आदींची उपस्थिती आहे. विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने भाजपकडून चाचपणी सुरू झाली आहे. विभागनिहाय आढावा घेण्यात आला. त्यानुसार त्या-त्या विभागातील आमदार व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यात दुपारी जळगाव बैठकीसाठी खासदार रक्षा खडसे, उन्मेष पाटील, खासदार डॉ. हीना गावीत, खासदार सुजय विखे पाटील, माजी मंत्री विजयकुमार गावीत, शिरपूरचे आमदार काशीराम पावरा, आमदार सुरेश भोळे, आमदार चंदूलाल पटेल, माजी मंत्री एकनाथराव खडसे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे- खेवलकर माजी आमदार गुरुमुख जगवाणी, महापौर सीमा भोळे उपस्थित होते.
गोपीनाथ मुंढे यांच्यावरही अन्याय झाला
मी देखील पक्षासाठी भरपूर केले, ‘हमाली’ केली, त्याचे फळ मला मिळाले. मला पक्षाने भरपूर दिले. मात्र माझा काही दोष नसताना मला पक्षाकडून डावलले जात आहे. दोषी असेल तर नक्की कारवाई करा, मात्र माझा काय दोष होता, हे पक्षाने मला सांगितले नाही व मला दूर सावरले. माझ्याप्रमाणे गोपीनाथ मुंढे यांच्यावरही अन्याय झाल्याचे प्रसंग आहे, त्यामुळे ओबीसी नेतृत्वाला का टार्गेट केले जात असल्याचे ते म्हणाले.
जीवाचे रान केल्याने पक्षाला चांगले दिवस आले
पत्रकारांशी बोलताना खडसे म्हणाले की, मला जातीबद्दल बोलायचे नाही, मात्र ही बाब पक्षासमोर आणून देणे गरजेचे असल्याचे आहे, असे सांगत गोपीनाथ मुंढे असो की इतर ओबीसी नेत्यांमुळे पक्षाचा चेहरा मोहरा बदलला व पक्ष इथपर्यंत आला. त्यामुळे ओबीसींचे नेतृत्व डावलून चालणार नाही असे स्पष्ट मत खडसे यांनी व्यक्त केले. ओबीसींनी जीवाचे रान करीत परिश्रम घेतले, त्यामुळे पक्षाला हे दिवस आले आहेत.
घरी बसायचे की पक्षाचे काम करायचे?
खडसे यांनी नेहमीप्रमाणे आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत भाजप पक्ष नेतृत्त्वाला लक्ष केले. खडसे पुढे म्हणाले, मी पक्ष सोडणार नाही, हे मी गेल्या २५ वर्षांत वेळोवेळी सांगितले आहे. पक्ष सोडण्याचा विचार माझ्या मनातदेखील नाही. जी व्यक्ती ४० ते ४२ वर्षे पक्ष वाढीसाठी तसेच पक्ष संघटन मजबुतीसाठी झटली आहे, ज्याने प्रतिकूल परिस्थितीतदेखील पक्ष संघटन उभे केले, त्याच्या मनात पक्षाविषयी चुकीचा विचार येऊच शकत नाही. मात्र काही जणांकडून माझ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. आज उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक असताना मला दुपारी ३.३० वाजता केवळ जिल्ह्याच्या आढाव्यासाठी बोलावण्यात आले. इतकेच नव्हे तर जळगाव जिल्ह्यातील कार्यक्रमांनादेखील बोलाविले जात नाही.
माझ्या राज्यभरातल्या समर्थकांना पुढे काय भूमिका घ्यायची? याबाबत विचारणा करणार आहे. घरी बसायचे की पक्षाचे काम करायचे, याबाबतचा निर्णय समर्थकांच्या सांगण्यानुसार घेणार आहे.