4 तालुक्यात भाजपा जोर लावणार

By admin | Published: January 23, 2017 01:10 AM2017-01-23T01:10:11+5:302017-01-23T01:10:11+5:30

नियोजन : आजी-माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणास लागणार

BJP will push in 4 talukas | 4 तालुक्यात भाजपा जोर लावणार

4 तालुक्यात भाजपा जोर लावणार

Next

जळगाव : गेल्या 15 वर्षापासून जिल्हा परिषद व सद्य:स्थितीला पाच पंचायत समिती ताब्यात असलेल्या भाजपाकडून जिल्ह्यात शत प्रतिशत भाजपासाठी आगामी निवडणुकीत घोडदौड सुरू करण्यात आली आहे. नगरपालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी आजही पक्षाला जळगाव, पारोळा, भडगाव व चोपडा या चार तालुक्यांमध्ये अस्तित्वासाठी लढा द्यावा लागत आहे. यशासाठी या तालुक्यांमध्ये मेहनत घ्यावी लागणार आहे.
चार पंचायत समित्या भाजपाकडे
जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांपैकी मुक्ताईनगर, बोदवड , भुसावळ  व जामनेर या चार पंचायत समित्यांवर भाजपाचे वर्चस्व आहे. तर जळगाव, धरणगाव व एंडोल या तीन पंचायत समित्यांवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. यावल व रावेर  या दोन पंचायत समित्यांवर काँग्रेसचे तर चोपडा, पारोळा, पाचोरा व चाळीसगाव या चार पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस तर भडगाव पंचायत समितीवर अपक्ष सभापती आहेत.
15 पंचायत समित्यांमध्ये
44 पंचायत समिती सदस्य
विधानसभा, लोकसभा, जिल्हा बँक व जिल्हा दूध संघात भाजपाने वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी भाजपाने रणनीती आखली आहे. भाजपाचे 15 पंचायत समित्यांमध्ये तब्बल 44 पं.स.सदस्यांचे संख्याबळ आहे. सर्वाधिक 10 सदस्य जामनेरात आहे. त्यापाठोपाठ रावेर व मुक्ताईनगरात 6 तर अमळनेर व चाळीसगावमध्ये 5 सदस्य आहेत. चोपडा, एरंडोल, धरणगाव या ठिकाणी भाजपाचे अत्यल्प संख्याबळ आहे.
जि.प.मध्ये 24 सदस्यांसह भाजपा मोठा पक्ष
जिल्हा परिषदेत 24 सदस्यांसह भाजपा हा मोठा पक्ष आहे. सर्वाधिक 6 जि.प.सदस्य हे जामनेर तालुक्यातून आहेत. तर चाळीसगाव व रावेर प्रत्येकी 4, अमळनेर 3, मुक्ताईनगर 2 व एरंडोल, यावल, धरणगाव, बोदवड व भुसावळ प्रत्येकी 1 जि.प.सदस्य आहेत. आमदार संजय सावकारे हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये गेल्यामुळे त्यांचे समर्थक जि.प.सदस्य भाजपामध्ये दाखल झाले. मात्र जिल्हा बँक संचालक व अमळनेर बाजार समितीचे माजी सभापती अनिल भाईदास पाटील हे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम भाजपावर होण्याची शक्यता आहे.
आजी-माजी मंत्र्यांची परीक्षा
जि.प.व पं.स.निवडणूक पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासाठी वर्चस्वाची लढाई राहणार आहे. जिल्ह्यात भाजपाचे सर्वाधिक आमदार व खासदार आहेत. गेल्या 15 वर्षापासून जिल्हा परिषद व काही पंचायत समित्या ताब्यात आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी करीत रणशिंग फुंकले आहे. भाजपा व सेनेची अद्याप युती झालेली नाही. यासा:यात जि.प.मधील असलेली सत्ता कायम राखण्यासाठी भाजपा नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
भाजपाचा जळगाव, पारोळा, भडगाव व चोपडा या चार तालुक्यांमध्ये मात्र अस्तित्वासाठी लढा सुरू आहे. चोपडा तालुक्यात एक पं.स.सदस्या भाजपाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. तालुक्यात एकही जि.प.सदस्य नाहीत. तर जळगाव, पारोळा व भडगाव या तीन तालुक्यांमध्ये भाजपाचा पं.स. किंवा जि.प. सदस्य नाही. चोपडा तालुक्यात 6, जळगावमध्ये 5, पारोळ्यामध्ये 4 तर 3 अशा 18 जि.प.गटांमध्ये भाजपाचा अस्तित्वासाठी लढा या निवडणुकीत राहणार आहे. जळगाव ग्रामीणमध्ये सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, पाचोरा व भडगावमध्ये आमदार किशोर पाटील तर चोपडय़ात आमदार चंद्रकांत सोनवणे हे शिवसेनेचे आमदार आहेत. तर पारोळा मतदार संघात राष्ट्रवादीचे डॉ.सतीश पाटील हे आमदार आहेत.

Web Title: BJP will push in 4 talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.