भाजप महिला पदाधिकारी व पोलिसात झटापट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:30 AM2021-02-28T04:30:02+5:302021-02-28T04:30:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पुजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी शनिवारी भाजपच्यावतीने करण्यात येणाऱ्या आंदोलनस्थळी भाजप महिला पदाधिकारी व पोलिसात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पुजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी शनिवारी भाजपच्यावतीने करण्यात येणाऱ्या आंदोलनस्थळी भाजप महिला पदाधिकारी व पोलिसात चांगलीच झटापट होऊन पोलिसांनी हेआंदोलन सुरू होण्यापूर्वीच बळाचा वापर करून उधळून लावले. आंदोलनासाठी जमलेल्या महिला पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यामुळे भाजपचे आंदोलन होऊ शकले नाही.
जळगाव जिल्हा व महानगर भाजपच्यावतीने शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकात महामार्ग क्रमांक सहावर चक्काजाम आंदोलन होणार होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आंदोलन, मोर्चे यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. असे असताना भाजपने आंदोलनाची हाक दिली. त्यामुळे या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. पोलीस उपस्थित असतानाच बाजूला थांबलेल्या भाजपच्या महिला महानगराध्यक्षा दीप्ती चिरमाडे यांनी भारत माता की जय अशी घोषणा देत महामार्गावर जाऊन आंदोलनाचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी धाव घेत महिलांना पकडले व थेट वाहनात बसवून पोलीस ठाण्यात नेले. या वेळी भाजपच्या महिला पदाधिकारी व महिला पोलिसांमध्ये चांगलीच झटापट झाली. पोलीस आंदोलक महिलांना ताब्यात घेत असताना राज्य शासन तसेच मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
वाहतूक सुरू असताना महामार्गावर जाण्याचा प्रयत्न
रस्त्याच्या कडेला थांबलेल्या भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी महामार्गावर वाहतूक सुरू असतानाच थेट तेथे जाऊन बसण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलीसही धावत होते. वाहतूक सुरू असताना हा प्रकार घडला आणि सर्वांचा थरकाप उडाला. त्यानंतर सर्व महिला आंदोलकांना ताब्यात घेऊन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आले.