भाजपचे ‘देर आए दुरुस्त आए’...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:15 AM2021-05-24T04:15:44+5:302021-05-24T04:15:44+5:30

जळगाव जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांच्या संख्येतही घट झाल्याने ऑक्सिजनची मागणी कमी झाली ...

BJP's 'come late, come right' ... | भाजपचे ‘देर आए दुरुस्त आए’...

भाजपचे ‘देर आए दुरुस्त आए’...

Next

जळगाव जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांच्या संख्येतही घट झाल्याने ऑक्सिजनची मागणी कमी झाली आहे. मात्र, एकवेळ अशी होती की, रुग्णालय व जिल्हा प्रशासनावर ऑक्सिजन किती तास पुरेल? व ऑक्सिजनचे टँकर किती वेळात पोहोचतील यासाठी घड्याळाचे काटे मोजावे लागत होते. त्यावेळी राज्यस्तरावरच भाजपची केवळ विरोधाची व टीका करण्याचीच भूमिका दिसून येत होती. मात्र, नंतर या भूमिकेत बदल झालेला दिसून आला. माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी एक ऑक्सिजन टँकर मागविला. तसेच त्यांनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. अर्थात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हाधिकाऱ्यांनी आधीच पाच प्रकल्पांचे प्रस्ताव मंजूर करून कार्यादेशही दिले आहेत. त्या प्रकल्पांची मशिनरी लवकरच दाखल होऊन ते प्रकल्प संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वीच कार्यरत होतील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे भाजपकडून आणखी पाच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आलेच तर ते जिल्ह्यातील जनतेच्या दृष्टीने फायदेशीरच ठरणार आहेत. आता रविवारी भाजपतर्फे आणखी एक ऑक्सिजन टँकर मागवून जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन टँकमध्ये तो ऑक्सिजन भरण्यात आला. जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनचे ३६८ बेड असून, सध्या त्यात २२० रुग्ण आहेत. म्हणजेच तब्बल १४८ ऑक्सिजनचे बेड आता जिल्हा रुग्णालयातच रिक्त आहेत. इतर खासगी रुग्णालयातही आता अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे मागविण्यात येत असलेला ऑक्सिजन पुरेसा ठरत आहे. मात्र, दुसऱ्या लाटेची मार्चअखेर व एप्रिल महिन्यात जेव्हा तीव्रता होती, तेव्हा ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटरच्या बेडची, रेमडेसिविरची कमतरता भासत होती. कुठे बेड मिळेल याची माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला हेल्पलाईन सुरू करावी लागली होती. त्यावेळी भाजपच काय, तर कुठल्याच राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते पुढे येऊन नागरिकांची मदत करताना दिसले नाहीत. नंतर हळूहळू काहींनी मदतीचा हात पुढे केला. भाजप तर सुरुवातीला केवळ विरोधासाठी विरोधाची भूमिका घेत राजकारणात व्यस्त असल्याने नागरिकांच्या मदतीला धावून जाण्याची संधी त्यांनी गमावली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने नागरिकांची गैरसोय झाल्याने त्यांचा राग या सरकारवर निघेल, अशी काहीशी समीकरणे बांधत केवळ बघ्याची भूमिका घेत टीका करण्याचे सत्र सुरू होते. मात्र, त्यामुळे नागरिकांचा भाजपवर रोष ओढावला जात आहे, हे लक्षात यायला भाजपच्या नेत्यांना थोडा वेळ लागला. नंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे सत्र सुरू झाले. प्रत्यक्ष लोकांना मदत करण्यासाठी भाजपनेही हेल्पलाईन सुरू केली. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. आता तर ऑक्सिजनची गरज बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे. असे असताना रविवारी भाजपने एक ऑक्सिजन टँकर स्वखर्चाने मागवून तो ऑक्सिजन जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन टँकमध्ये भरण्यात आला. लोकांना अडचणीच्या काळात मदतीचा हात देऊन त्यांची सहानुभूती मिळविण्याची संधी गमावलेल्या भाजपने हे सुरू केलेले प्रयत्न म्हणजे ‘देर आए दुरुस्त आए...’ असेच म्हणावे लागेल. दुर्दैवाने तिसरी लाट आलीच तर त्यासाठी जिल्हा प्रशासनाने सिद्धता ठेवावी यासाठी भाजपनेही आतापासून पाठपुरावा करून त्यात सक्रिय सहभाग नोंदविला तर नागरिकांनाही ते निश्चितच दिलासादायक ठरणार आहे.

Web Title: BJP's 'come late, come right' ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.