भाजपातील दुही ‘चलो गाव की ओर’...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 01:17 PM2018-11-29T13:17:48+5:302018-11-29T13:18:22+5:30
ग्रामीण क्षेत्र हेच खरे राजकारणाचा कणा
चंद्रशेखर जोशी
ग्रामीण क्षेत्रातील वडाचे पार हे राजकारणाचे अड्डे असतात. गावात कोणाच्या घरात काय झाले यापासून तर मोदींनी काय निर्णय घेतला... याबाबतच्या गप्पा या पारावर होत असतात. विशेष म्हणजे ही गप्पा मारणारी मंडळी एकाच पक्षाचा विचार घेऊन चालणारी असते काय तर त्याचे उत्तर नाही असेच मिळेल. याचे कारण बहुतांश मंडळी एखाद्या पक्षाचा विचार किंवा निर्णय आवडला की त्या बाजुने बोलायला सुरूवात करते, आणि हळू हळू तो विचार पारावरच्या गप्पांवरून घरातील ओसरीपर्यंत पोहोचतो. घरातील बायाबापड्यांपर्यंत ती चर्चा पोहोचते. तरूण मुलांच्या गप्पांमध्येही या पक्षाने हा निर्णय घेतला तो चांगला होता...इथपर्यंत बोलणे सुरू असते. त्यामुळेच ग्रामीण क्षेत्र हेच खरे राजकारणाचा कणा असल्याचे बोलले जाते. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद गटाबाबतचे निर्णय याच पारावर ठरतात. त्यामुळेच राजकीय पक्षाचा ओढा हा ग्रामीण भागाकडे सर्वाधिक असतो. विशेष म्हणजे मतदानाचे प्रमाणही ग्रामीण भागातून जास्त निघते त्यामुळे पुढारी मंडळी ग्रामीण भागातील लोकांना जास्त जपतात. आपल्या राजकारणावर ग्रामीण भागाचा नेमका काय परिणाम होतोय.. याचा विचार राजकीय पक्ष अगत्याने करत असतात. ग्रामीण भागातील लोकभावना नेमकी काय? हे लक्षात घेऊन भाजपाने पक्षाचा विस्तार केला व गेल्या काही वर्षातील निवडणुकांमध्ये या पक्षाला सातत्याने यश येत आहेत. मग ते अगती ग्रामपंचायतीपासून तर लोकसभा, विधानसभा व सहकार संस्था, पालिका, महापालिका, नगरपंचायती ते जिल्हा परिषद, पंचायत समित्यांपर्यंत या पक्षाने यश मिळविले आहे. मात्र गत काळाचे अवलोकन करता विविध ठिकाणी सत्तेत असताना या पक्षाला ही सत्ता पचविता येत नसल्याचेच लक्षात येत आहे. जिल्हा परिषदेच्या बैठकीतील वादावरून यावर शिक्कामोर्तब झाले आहे. १२० कोटींचा विकास निधी मिळतो. तो वाटपावरून विरोधकांनी ओरड करणे ठिक आहे पण सत्ताधारीच जर गोंधळ घालत असतील तर... ते दुर्दैवच म्हणावे लागेल. सत्ताधाऱ्यांची एक परंपरा पूर्वी होती आणि आजही आहे, ती म्हणजे सत्ताधारी विकास निधी अगोदर आपापल्या मतदार संघांमध्ये वाटून उरलेला किरकोळ निधी विरोधकांना देतात. मात्र पक्षातील जिल्ह्याचे राजकारण जिल्हा परिषदेत आले आणि त्यातून निधी वाटपाचा प्रश्न निर्माण झाला. सत्ताधाºयांच्या बंडामुळे जिल्हा परिषदेत विरोधक प्रबळ झाल्याची स्थिती आहे. भविष्यात याचे पडसादही उमटू शकतात. पक्षातील दुहीमुळे ‘चलो गाव की ओर’ हा नारा उलटा होत आहे की काय? अशी परिस्थिती या पक्षात दिसून येत आहे.