सत्ता गेल्याचे भाजपचे सुतक अजून संपेना....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:15 AM2021-04-21T04:15:46+5:302021-04-21T04:15:46+5:30

वार्तापत्र महापालिकेच्या २०१८ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ऐतिहासिक बहुमत मिळवत सत्तेत आलेल्या भाजपला अवघ्या अडीच वर्षांत सत्तेपासून दूर जावे ...

BJP's death anniversary is not over yet .... | सत्ता गेल्याचे भाजपचे सुतक अजून संपेना....

सत्ता गेल्याचे भाजपचे सुतक अजून संपेना....

Next

वार्तापत्र

महापालिकेच्या २०१८ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ऐतिहासिक बहुमत मिळवत सत्तेत आलेल्या भाजपला अवघ्या अडीच वर्षांत सत्तेपासून दूर जावे लागले आहे. हा धक्का भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपासून ते भाजपमधील सर्व नगरसेवकांना चांगलाच बसला आहे. महापालिकेतील सत्तांतर आला आता महिना झाला असून, अजूनही महापालिकेतील आता विरोधी पक्ष झालेल्या भाजपचे सत्ता गेल्याचे सुतक अजूनही संपलेले दिसून येत नाही. भाजपचे नगरसेवक जणू अज्ञात वासातच गेल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजप आपली जबाबदारी पार पाडताना दिसून येत नाही. तसेच भाजपमधील नगरसेवक देखील अजूनही सत्ता गेल्याचे दुःख पचवीत घरात आराम ठोकत असल्याचे चित्र सध्या शहरात पाहावयास मिळत आहे. शहरातील अनेक नागरिकांना बेड उपलब्ध होत नसून, बेडसाठी नागरिक वणवण फिरत आहेत. कुठे ऑक्सिजन उपलब्ध नाही तर कोणाला रेमेडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत नागरिकांची मदत करणे सोडत असूनही भाजपचे नगरसेवक दुःखात पूर्णपणे बुडालेले दिसून येत आहेत. महिनाभरात सत्ता गेल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी फुटून गेलेल्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी ज्या हालचाली केल्या त्या हालचाली नागरिकांना सुविधा देण्यासाठी केल्या असत्या तर कदाचित सत्तांतराची वेळ भाजपवर आली नसती. असो मात्र आता भाजप विरोधी पक्ष असताना देखील जी जबाबदारी पार पाडण्याची गरज आहे, त्या जबाबदारीपासून देखील भाजपचे नगरसेवक व पदाधिकारी दूर पडताना दिसून येत आहेत. राज्य पातळीवरून जे विषय येत आहेत तेवढेच विषय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात इतपत काम सध्या भाजपचे पदाधिकारी शहरात करताना दिसून येत आहेत. शहरातील रस्त्यांचा समस्यांसाठी भाजपने ७० कोटी रुपयांचा मनपा फंडातून कामे करण्याबाबत ठराव करून घेतला होता. यासाठी देखील आता कोणताही पाठपुरावा होताना दिसून येत नाही. तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जणू महापालिकेवरच बहिष्कार टाकला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. महापालिकेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील कोरोना सेंटरमध्ये रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा खालावला असतानाही याबाबत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजप नगरसेवक शांत बसलेले आहेत, नगरसेवक कैलास सोनवणे काही प्रमाणात किल्ला लढविताना दिसत असले तरी विरोधी पक्ष म्हणून भाजप अजूनही आपली भूमिका बजावताना दिसून येत नाही. केवळ भाजपचेच नाही तर शिवसेना व भाजपमधून फुटून शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांचा गट देखील नागरिकांवर आलेल्या संकटात दूर गेलेला दिसून येत आहे. महापौर जयश्री महाजन या काही प्रमाणात कोरोनाच्या संकटात आपली जबाबदारी पार पाडत असल्या तरी महापालिकेतील नगरसेवक या परिस्थितीत लॉकडाऊन झालेले दिसून येत आहेत. ठरावीक नगरसेवक या परिस्थितीतही काम करत असले तरी ही संख्या कमीच आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून शहरातील विकास कामांवर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत सत्ताधाऱ्यांनी या समस्येवर मात करून शहरातील विकासाची मंदावलेली गती वाढवण्यासाठी काम करण्याची गरज आहे. तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपला आता सत्तांतराचे दुःख पचवून विरोधी पक्षाची भूमिका पार पाडून शहरातील नागरिकांना न मिळालेल्या सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

Web Title: BJP's death anniversary is not over yet ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.