पाचोरा शहरात खड्ड्यांविरोधात भाजपचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 03:17 PM2019-08-03T15:17:25+5:302019-08-03T15:18:43+5:30
भुयारी गटारींमुळे ऐन पावसाळ्यात शहरातील कॉलनी आणि गल्लीबोळात झालेली रस्त्यांची दुर्दशा आणि त्यामुळे होणारे अपघात आणि निर्माण झालेल्या अडचणी या विरोधात भाजपतर्फे अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात शहरातील कृष्णापुरीपासून पालिका कार्यालयापर्यंतच्या मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
पाचोरा, जि.जळगाव : भुयारी गटारींमुळे ऐन पावसाळ्यात शहरातील कॉलनी आणि गल्लीबोळात झालेली रस्त्यांची दुर्दशा आणि त्यामुळे होणारे अपघात आणि निर्माण झालेल्या अडचणी या विरोधात भाजपतर्फे अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात शहरातील कृष्णापुरीपासून पालिका कार्यालयापर्यंतच्या मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी भाजप नेत्यांतर्फे विविध खड्ड्यांत वृक्षारोपण करण्यात येऊन सत्ताधारी शिवसेनेविरोधात फलकदेखील लावण्यात आले.
भाजपतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, शहरातील सर्व रस्ते आणि गल्लीबोळात तसेच कॉलनी भागात रस्त्याची फार मोठ्या प्रमाणात दुर्दशा झालेली आहे. पालिकेत वारंवार तक्रारी करूनसुद्धा कोणतेही पाऊल उचललेले नाही. शहरातील रस्त्यांवर भुयारी गटारींची कामामुळे खोदकाम झालेले असून संपूर्ण रस्ते पूर्णत: मोडकळीस आलेले आहेत. गटारींसाठी केलेले खोदकामदेखील व्यवस्थित न बजावल्यामुळे सध्याच्या पावसाळी परिस्थितीत अनेक ठिकाणी खड्ड्यात पाणी साचले आहे. शहरात सर्वत्र रस्त्यांवर उंच सखल भाग तयार झाले आहेत. रहदारीसाठी त्यामुळे खूप अडचणी येत असून शाळकरी मुले,वृद्ध व अपंग व्यक्तींना रस्त्याने चालणे अवघड झाले आहे. याशिवाय पाचोरा शहरातील भडगाव रोड रस्त्यावरील दुतर्फा असलेले विद्युत खांबदेखील वाहतुकीसाठी आणि रहदारीसाठी खूप मोठी समस्या बनली आहे . सुधारणेच्या नावाखाली भुयारी मार्ग ते कॉलेज चौक या दरम्यान टाकलेले दुभाजक आणि त्याठिकाणी असलेल्या विद्युत खांबांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.
भडगाव रोडवरील विजेचे खांब तात्काळ न हलवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारादेखील निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर अस्मिता पाटील, जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, पंचायत सभापती बन्सी पाटील, शहराध्यक्ष नंदू सोमवंशी यांच्यासह सतीश शिंदे, रेखा पाटील, हेमंत चव्हाण, प्रदीप पाटील, साधना देशमुख, अर्चना पाटील, समाधान मुळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.