यावल उपसभापती पदासाठी पुन्हा भाजपाचे दैव बलवत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:20 PM2021-03-09T16:20:18+5:302021-03-09T16:20:46+5:30
यावल पंचायत समितीच्या उपसभापतीपदी भाजपाचे योगेश दिलीप भंगाळे यांची ईश्वर चिठठीने निवड झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यावल : पंचायत समितीच्या उपसभापतीपदाची निवड सोमवारी दुपारी झाली. त्यात भाजपाचे योगेश दिलीप भंगाळे यांची ईश्वर चिठठीने निवड झाली आहे.
भाजपचे भंगाळे व काँग्रेसच्या कलीमा तडवी या दोन्ही सदस्यांना चार-चार मते मिळाल्याने निवड ईश्वर चिठ्ठीने केली असता भंगाळे हे विजयी ठरले आहेत. सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार महेश पवार होते. गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांनी सहकार्य केले. प्रेम देवरे या दहा वर्षीय मुलाचे हातून चिठ्ठी काढण्यात आली.
येथील पंचायत समितीमध्ये सत्ताधारी व विरोधी पक्षाची सदस्यसंख्या समान असताना विद्यमान उपसभापती दिपक पाटील यांनी आमदार हरीभाउ जावळे यांनी भाजपा सदस्य योगेश भंगाळे यांना उपसभापती पदासाठी सव्वा वर्षाचा दिलेला शब्द पाळण्यासाठी भाजपाने ईश्वर चिठ्ठीने मिळालेले पाटील यांचे उपसभापती पद पणास लावत पुन्हा ईश्वर चिठ्ठीनेच बळकावले आहे.
समसमान बलाबल
पंचायत समितीमध्ये आठ सदस्य संख्या असून भाजपा व काँग्रेस प्रत्येकी सदस्य संख्या चार आहे. सव्वा वर्षापूर्वी काँग्रेसचे उपसभापती उमाकांत पाटील यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने उपसभापती पदाचे निवडीत भाजपाचे दिपक पाटील ईश्वर चिठ्ठीने निवडून आले होते. त्यावेळेस आमदार कै. हरीभाउ जावळे यांनी दिपक पाटील यांंच्या सव्वा वर्षानंतर योगेश भंगाळे यांना संधी दिली जाईल, असा शब्द दिल्यानुसार दिपक पाटील यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्तपदी पुन्हा ईश्वर चिठ्ठीनेच उपसभापती पद बळकावले आहे.