सेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपाला युतीधर्माची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 11:20 AM2019-03-27T11:20:46+5:302019-03-27T11:21:05+5:30
तालुका वार्तापत्र : एरंडोल
एरंडोल : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या एरंडोल तालुक्यात भाजपाला शिवसेनेकडून युती धर्म पाळला जाईल अशी अपेक्षा आहे.
एरंडोल तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानण्यात येतो. शिवसेनेचे मजबूत संघटन पाहता या निवडणुकीत शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार चिमणराव पाटील, माजी विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश महाजन, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर व राजेंद्र चौधरी, तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, जि.प.चे माझी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले व इतर पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन भाजपा उमेदवार स्मिता वाघ यांना प्रचार यंत्रणा राबवावी लागणार आहे.
भाजपाचे संघटन मंत्री अॅड.किशोर काळकर हे स्थानिक असल्यामुळे त्यांचे लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत.
एरंडोलचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेशसिंह परदेशी हे भाजपाचे आहेत. भाजपाचे तालुकाध्यक्ष एस.आर.पाटील यांचे पक्षसंघटनेला बळकटी देण्याचे काम व त्यांचा जनसंपर्क याचा लाभ भाजपा उमेदवाराला कितपत होतो हे मतदान यंत्रातच समजेल.
धरणगाव-एरंडोल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद हे भाजपाचे संभाजी चव्हाण यांच्याकडे आहे. याशिवाय तालुक्यातील ५२ पैकी १७ ग्रामपंचायतींचे सरपंच भाजपाचे आहेत तर बहुतांश ग्रामपंचायतींचे सरपंचपद शिवसेनेकडे आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी तालुक्यात आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन संपर्क अभियान राबविले. आमदार डॉ.सतीश पाटील व त्यांच्या टीममधील अमित पाटील, तालुकाध्यक्ष प्रा.मनोज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुखप्रमुख पराग पवार, आर.ए.शिंदे, डॉ.राजेंद्र देसले यांनी कामाला सुरुवात केली आहे.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन, सुकलाल महाजन, योगेश महाजन, डॉ.भूषण पाटील, संजय भदाणे व इतर पदाधिकाऱ्यांकडून आघाडीचा धर्म पाळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, दोन्ही उमेदवारांचा एरंडोल तालुक्याशी जवळचा संबंध नसला तरी त्यांच्या पक्षाचे व मित्र पक्षाचे नेते व त्यांचे नेटवर्क कामाला येणार आहे.