भाजपचा इनकमिंग कोटा फुल्ल, इतर पक्षांतील लोकांना घेण्याचा विचार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 06:39 PM2023-07-09T18:39:53+5:302023-07-09T18:40:56+5:30
ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांचे प्रतिपादन
मोहन सारस्वत/ जामनेर (जि. जळगाव) : भाजपचा इनकमिंग कोटा आता संपला आहे. त्यामुळे इतर पक्षांतील लोकांना भाजपत घेण्याबाबत विचार नाही, असे राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. एकलव्य शाळेच्या पटांगणावर रविवारी रोजगार मेळावा झाला. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरीलप्रमाणे माहिती दिली.
कॉंग्रेसमधूनही काही नेते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, अजित पवार उपमुख्यमंत्री होते. ते भाजपमध्ये आल्याने त्यांना उपमुख्यमंत्री करता आले. कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री येणार असल्याचे तुम्ही सांगतात, मात्र त्यांना घेऊन दोन मुख्यमंत्री कसे करणार? असा मिश्कील सवाल त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यावर बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री असताना त्यांनी कधी विदर्भाचा दौरा केला नाही. विदर्भाप्रती असलेले त्यांचे प्रेम पुतना मावशीचे असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. विधान परिषदेच्या सभापतिपदी भाजपचे राम शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू असताना बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचे नाव समोर आले आहे, याबाबत ते म्हणाले की, आता आमचे सरकार तीन इंजिनचे असल्याने सर्वानुमते निर्णय घेऊ.
सध्या खुर्च्यांची पळवा-पळवी सुरू असल्याने खुर्ची सांभाळा, असा गमतीशीर टोलाही त्यांनी लगावला. जर्मनीत नोकरीच्या सर्वाधिक संधी आहेत. त्यामुळे राज्यातील जास्तीत जास्त बेरोजगार युवकांनी जर्मनीत गेले पाहिजे, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी जर्मन भाषा शिकविण्याबाबतदेखील प्रयत्न सुरू असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.