मर्यादा शक्ती असलेल्या नेतृत्त्वामुळेच भाजपाचा जळगावात विस्तार : भय्याजी जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 05:28 PM2017-11-22T17:28:05+5:302017-11-22T17:38:58+5:30
बापूराव मांडे यांचा भुसावळात अमृत महोत्सव सोहळा थाटात
आॅनलाईन लोकमत
भुसावळ,दि.२२ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अविरत सेवक बापूराव (प्रभाकर) मांडे यांच्यामुळे जिल्ह्यात भाजपाचा विकास झाला आहे. खूप मर्यादा शक्ती असलेले ते नेतृत्त्व आहे, असे गौेरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी बुधवारी येथे भुसावळात काढले. संत ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूराव मांडे यांचा अमृत महोत्सवी गौरव व कार्यगौरव विशेषांक प्रकाशन सोहळा शहरातील संतोषीमाता सभागृहात बुधवारी झाला. प्रमुख अतिथी म्हणून माजीमंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी खासदार डॉ.गुणवंतराव सरोदे, विभागीय सरसंघ चालक शशी महाजन, नाना मांडे आदी उपस्थित होते.
मांडे यांच्यात अनेकांना टोपी घालण्याची क्षमता होती. मात्र त्यांनी टोपी स्वत: ही घातली नाही व दुसºयांना ही घातली नाही. संघाने अजून काही जबाबदारी दिल्यास ती स्वीकारण्याची ईच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे अनेकांना धक्का बसला असेल. मात्र संघ त्यांना जबाबदारी देवो किंवा ना देवो ते संघाचे अखेरच्या क्षणापर्यंत कार्य करीत राहणार असल्याचे त्यांनी कौतुक केले. कार्यगौरव विशेषांकाचे प्रकाशन भय्याजी जोशी यांच्याहस्ते करण्यात आले.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आपल्या भाषणात, ज्यांना घडविले ते दूर जातात ज्यांनी काहीच केलेले नसते ते जवळ येतात अशी खंत व्यक्त केली. संघाच्या शाळेत गाढव टाकले तरी माणूस म्हणून बाहेर येतो. १९८० साली भाजपाची स्थापना झाली. संघाचे त्यात मोठे योगदान आहे. नेता घडण्यास फार वेळ लागतो. नेता घडल्यानंतर पक्ष वाढतो. माझ्यामुळे पक्ष वाढला असा गैरसमज कुणाचा असेल तर तो चुकीचा असल्याची कोपरखळी त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचे नाव न घेता मारली.