रावेर पंचायत समिती सभापतीपदी अखेर भाजपच्या कविताबाई कोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 01:55 PM2021-02-16T13:55:50+5:302021-02-16T13:57:20+5:30
रावेर पंचायत समिती सभापतीपदी अखेर भाजपच्या कविताबाई कोळी यांची निवड झाली.
रावेर : पंचायत समितीच्या सभापती पदासाठी भाजपच्या तांदलवाडी गणातील कविता हरलात कोळी तर उपसभापतीपदी केर्हाळे गणातील भाजपच्या धनश्री संदीप सावळे यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने व छाननअंती ते वैध ठरल्याने अध्यासी अधिकारी तथा तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी त्यांची अविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
राष्ट्रवादीकडून भाजपचे दोन सदस्य वाटेवर तर भाजपकडून राष्ट्रवादीचे दोन सदस्य भाजपच्या वाटेवर असे बुमरँग करण्याचे डावपेच खेळत काहींनी काठी उपटून साप पळवण्यासाठी कवित्व रंगवले होते. मात्र, भाजपकडे बारापैकी आठ सदस्यांचे निर्विवाद बहुमत असताना तथा शिवसेना - भाजपचे साप मुंगसाचे वैमनस्य असले तरी कविताबाई कोळी व सेनेच्या सविताबाई कोळी या आप्तेष्ट असल्याने तथा माजी मंत्री एकनाथ खडसे व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिष्ठेच्या लढाईतही शिवसेनेचा सदस्य महाविकास आघाडीला समर्थन करण्याची आशंकाच होती.
त्या अनुषंगाने सोमवारी सभापती पदासाठी भाजपच्या तांदलवाडी गणातील कविता हरलात कोळी तर उपसभापतीपदी केर्हाळे गणातील भाजपच्या धनश्री संदीप सावळे यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने व छाननअंती ते वैध ठरल्याने अध्यासी अधिकारी तथा तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी त्यांची अविरोध निवड झाल्याचे घोषित केले. नवनिर्वाचित सभापती कविताबाई कोळी व उपसभापती धनश्री सावळे यांचे अध्यासी अधिकारी उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल, मावळते सभापती जितेंद्र पाटील, मावळते उपसभापती जुम्मा तडवी, पी के महाजन, माधुरी नेमाडे, अनिता चौधरी, योगिता वानखेडे, योगेश पाटील, दीपक पाटील, प्रा.डॉ.प्रतिभा बोरोले व रूपाली कोळी यांनी सत्कार केला.
दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, वेटी बचाओ बैठी पढाओचे राष्ट्रीय समन्वयक डॉ राजेंद्र फडके, जि.प.चे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, माजी सभापती सुरेश धनके, जि.प.चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जि.प.समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, डॉ.विजय धांडे, भाजप तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, तालुका सरचिटणीस महेश चौधरी, सी.एस.पाटील, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, कृ.उ.बा.सभापती श्रीकांत महाजन, प्रल्हाद पाटील, गोपाळ नेमाडे, महेश पाटील, अमोल पाटील, सुनील पाटील आदी कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला.