जळगाव जिल्यातील भाजपा पं.स.सदस्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2018 12:21 PM2018-06-04T12:21:56+5:302018-06-04T12:22:09+5:30
आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.
जळगाव - मेहुणबारे (ता.चाळीसगाव) गणातील भाजपाच्या पंचायत समिती सदस्या रुपाली पियूष साळुंखे (वय २६) यांनी मेहुणबारे येथे राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी पहाटे पाचवाजेपूर्वी घडली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.
चाळीसगाव शहरापासून दहा किमी अंतरावर पश्चिमेला मेहुणबारे येथे मुख्य रस्त्यालगत पोस्ट अॉफीसजवळ रुपाली साळुंखे यांचे कुटूंबासोबत वास्तव्य होते.
पंधरा महिन्यांपूर्वी झालेल्या पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत रुपाली साळुंखे यांनी भाजपातर्फे उमेदवारी करतांना राष्ट्रवादीच्या प्रतिस्पर्ध्याला हरवून तरुण सदस्या म्हणून विजय मिळविला होता. त्यांचे पती पियूष साळुंखे हे भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते असून मेहुणबारे येथेच दूध व्यवसाय करतात. त्यांचा विवाह तीन वर्षापूर्वी झाला होता. शिरसमणी ता. पारोळा हे त्यांचे माहेर. त्यांना दोन वर्षाची एक मुलगी आहे. दरम्यान मेहुणबारे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
रुपाली साळुंखे यांच्या पश्चात सासू-सासरे, पती असा परिवार आहे. त्यांच्यावर दुपारी अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. अप्पासाहेब उत्तम पाटील (रा. मेहुणबारे) यांच्या खबरीवरुन मेहुणबारे पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पीएसआय हेमंत शिंदे करीत आहे.