आरक्षणाच्या नावावर भाजपची राजकीय दुकानदारी; रोहीत पवार यांची टीका
By सुनील पाटील | Published: September 2, 2023 02:11 PM2023-09-02T14:11:37+5:302023-09-02T14:11:52+5:30
देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ राजीनामा द्यावा, येत्या ५ सप्टेंबर रोजी शरद पवार यांची जळगावात सभा होत आहे. त्यापार्श्वभूमीवर रोहीत पवार शनिवारी जळगावात दाखल झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भाजपला आरक्षण नको आहे, पण आरक्षणाच्या मुद्यावर मात्र राजकारण करायचे आहे. आता केंद्राने पाच दिवसाचे संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे, असेल हिंमत तर याच अधिवेशनात मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा असे आव्हान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शनिवारी भाजपला दिले आहे. जालन्यात आंदोलकांवर लाठीमार हा गृहमंत्रालयाच्याच आदेशाने झालेला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याला सर्वस्वी जबाबदार असून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.
येत्या ५ सप्टेबर रोजी शरद पवार यांची जळगावात सभा होत आहे. त्यापार्श्वभूमीवर रोहीत पवार शनिवारी जळगावात दाखल झाले. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप व सरकारवर टिका केली. यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, पालघर जिल्ह्यातील विक्रमगढचे आमदार सुनील भुसारा, जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील आदी उपस्थित होते. राज्यात ४० टक्केपेक्षा कमी पाऊस आहे. दुबार पेरणीसह पिण्याच्या पाण्याचे संकट आहे. शेती मुख्य व्यवसाय असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काचाही प्रश्न निर्माण झालेला आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना मदत करावी, अन्यथा आम्ही दुष्काळ जाहिर करण्यास भाग पाडू असा इशाराही त्यांनी दिला.
जालन्यात आधी पोलिसांकडून लाठीचार्ज
जालन्यात आधी दगडफेक झाली व नंतर लाठी चार्ज झाला असे सरकार सांगत आहे. आपण आज पहाटे २.३० वाजता जालन्यात जाऊन जे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून उपोषणाला बसले होते, त्यांच्या कुटूंबियांची आपण भेट घेतली. तेथील परिस्थितीची माहिती घेतली. येत्या ८ सप्टेबर रोजी जालन्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम होत आहे. त्यापार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघडू शकतो म्हणून मुंबईत महायुतीच्या बैठक सुरु असताना पोलिसांना निरोप आला व त्यांनी आंदोलनकर्त्यांना उचलले. त्यातून वाद झाला. पोलिसांनी लाठीचार्ज करायला सुरुवात केली, त्यानंतर दगडफेक झाली. यात छऱ्याचा वापर झालेला आहे. अनेकांच्या छातीत, पोटात व शरीरात छरे आढळून आले. हा कोणता प्रकार आहे. याआधी असा प्रकार कधीच घडलेला नाही. जालन्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी नसताना अमानुषपणे लाठीचार्ज होतो. गृहमंत्रालयाच्या आदेशानेच पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. या घटनेचा आपण निषेध करीत असल्याचे रोहित पवार म्हणाले.